खानापूर /प्रतिनिधी:
खानापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा कणा असलेल्या लैला साखर कारखान्याचा २०२४- २५ गळीत हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी प्रत्यक्षात गळीत हंगामाला कधी सुरुवात होणार ? कारखान्याची धुरांडी कधी पेटणार? असा प्रश्न खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महांतेश राऊत यांनी गुरुवारी येथील विश्रामधामात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. या पत्रकार परिषदेत लैला साखर कारखान्याच्या गळीत हंगाम संदर्भात तसेच तालुक्यातील अनेक विषयावर मांडणी केली.
यावेळी बोलताना म्हणतेस राऊत म्हणाले, खानापूर तालुक्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. पण लैला साखर कारखान्याने गळीत हंगामाला एक महिना उशीर केला आहे. हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे. पण महालक्ष्मी ग्रुपने भाडेतत्त्वावर घेऊन या ठिकाणी मनमानी कारभार सुरू केला असून एक तर गळीत हंगामाला उशीर केला आहे. त्यातच अद्याप उसाचा दरही जाहीर केला नाही त्यामुळे शेतकरी द्विधा अवस्थेत आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊस आहे शेवटी जर ऊस शिल्लक राहिला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करून तात्काळ कारखाना सुरू करावा अशी त्यांनी विनंती केली.
यावेळी बोलताना केपीसीसी सदस्य महादेव कोळी म्हणाले, आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लोकांना आपलंसं करण्यासाठी कारखान्याकडून ऍडव्हान्स देणे, अधिक दर देण्याची घोषणा करणे असे करून सहानुभूती मिळवली. आमदारही झाले. पण आता लागलीच दुसऱ्या वर्षी कारखान्याच्या गळीत हंगामाकडे मात्र साप दुर्लक्ष झाले आहे. शेतात पीक आणि घरात भिक अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. यासाठी तात्काळ कारखाना सुरू करून उसाचा दरही अधिकाधिक जाहीर करावा असे त्यांनी सुचित केले.
महाराष्ट्रातील तोडण्याची व्यवस्था करा! यावर्षीचा उसाचा दर जाहीर करा!
यावेळी बोलताना ब्लॉक काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले, महालक्ष्मी ग्रुपच्या लैला व्यवस्थापनाने कारखान्याच्या दुरुस्तीचे काम सहा महिने अगोदर घेणे गरजेचे होते. ऐन गळीत हंगामाच्या काळात दुरुस्तीचे काम घेऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. कारखान्याच्या गळीत हंगामाला एक महिन्याहून अधिक उशीर झाला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाचे पीक आहे अशा मध्ये कारखाना उशिरा सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे अशातच उसाचा दरही अद्याप कारखान्याने जाहीर केला नसून तो दरही जाहीर करावा व महाराष्ट्रातील ऊस तोडण्या आणून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी ही विनंती त्यांनी यावेळी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जॉकी फर्नांडिस म्हणाले, खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी महालक्ष्मी यात्रा आहेत अशा ठिकाणचा ऊस त्वरित उचलण्यासाठी कारखाना लवकरात लवकर सुरू करून त्या भागातील लोकांना ऍडव्हान्स देण्यात यावे अशीही मागणी त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश जाधव, केपीसीचे सदस्य महादेव कोळी, नगरसेवक लक्ष्मण मादार, महिला अध्यक्ष दीपा पाटील, वैष्णवी पाटील, संगमनेश वाली, महावीर हुलीकवी, देमंना बसरीकटी, इसाक, तोहिद, गुड्डू टेकडी आधी उपस्थित होते.