खानापूर: संकट आणि संघर्ष शिवाय जीवनात यश मिळवता येत नाही. मराठा समाजातील तरुणांनी कोणत्याही कामाची लाज न बाळगता उद्योग आणि व्यवसायात करिअर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मोठमोठी उद्योगाची साम्राज्यं लहान व्यवसायातूनच उभी राहिली असून प्रामाणिकपणा प्रयत्न सातत्य व्यवहारिकता पैशाचा योग्य विनियोग आणि वेळेचे नियोजन केल्यास सर्व क्षेत्रात मराठी समाजाचे वर्चस्व प्रस्थापित करता येते. अशा मराठी समाजाने संपूर्ण आयुष्यात समाजाच्या उन्नतीसाठी व बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी वेळोवेळी प्रबोधनात्मक मार्गदर्शन करत समाज घडवण्याचे काम स्वर्गीय उदयसिंह सरदेसाई यांनी केले असल्याचे प्रतिपादन जिजाऊंचे वंशज नामदेवराव जाधव (पुणे)यांनी केले.
खानापूर शहरातील शुभम गार्डन येथे ज्येष्ठ विचारवंत दिवंगत उदयसिंह सरदेसाई यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठी पालक प्रबोधन मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
श्री नामदेवराव जाधव म्हणाले, मोठी स्वप्ने साकार करायची असतील तर केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसायाकडे वळायला हवे. मराठा समाजातील तरुणांना जर चंगळवाद आणि भुकेवर मात करता आली तर तुम्हाला भीतीवरही मात करता येऊ शकते. त्यासाठी ज्ञानाची भूक भागवण्यासाठी दिवस रात्र एक करा असे आवाहन केले. एका दिवसाच्या प्रतिष्ठेसाठी आयुष्यभर कर्जाचे ओझे अंगावर घेऊ नका. लग्नाचा थाटमाट कमी करा. पैसा कमावण्यापेक्षा तो गुंतवण्याची कला आत्मसात करा असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.
तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे संवाद कमी झाला आहे. व्यक्त आणि मुक्त होणे जमत नसल्याने निराशा आणि तणावात वाढ झाली आहे. अतिवापरामुळे मोबाईलने घरातील माणसे आणि माणूसपण पळवले आहे. सर्व व्यसनांपेक्षा मोबाईलचे व्यसन घातक असल्याचे जाधव यांनी सांगितले.
बालवयातच विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके द्या. वाचलेली पिढी वाया जात नाही याचे उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शहाजी राजांच्या पदरी 70 साहित्यिक होते. बेंगलोर येथे पहिले मराठी साहित्य संमेलन शहाजीराजे यांनी भरवले होते. त्यांनी शिवरायांवर बाल वयातच वाचनाचे संस्कार केले. पाच वर्षात शिवरायांना 32 विषय शिकवले. शिवरायांच्या कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्वात वाचनाचे योगदान महत्त्वाचे होते. शिवचरित्राचा डोळसपणे अभ्यास केला तर एकही तरुण आत्महत्या करणार नाही असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात किर आवळे मठाचे मोठा दिस पूज्य श्री मंगल माताजी महाराज यांच्या दिव्य सानिध्यात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दिगंबर पाटील, चांगलेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक वाय.एन मजूकर ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पीटर डिसोजा, साहित्यिक गुणवंत पाटील, तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, यशवंत बिरजे,प्रकाश चव्हाण, सिताराम बेडरे, संजय पाटील, समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पा गुरव, परमेकर यासह अनेक जण उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे पूजन झाले. तर स्वर्गीय उदयसिंग सरदेसाई यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्वागताध्यक्ष या नात्याने बोलताना निरंजन सरदेसाई यांनी वडिलांनी समाजाला प्रबोधन करण्याचे काम केले. त्यांच्या कार्याचा वसा कायम समाज मनात वाढवण्यासाठी आमचे यापुढील काळात प्रयत्न कायम राहणार आहेत. आज मोठ्या संख्येने वडिलांच्या पुण्यस्मरणात उपस्थिती दर्शवून अनेक हितचिंतक व समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवून प्रेरणा, प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांचे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमात खानापूर तालुक्यामध्ये विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी स्वर्गीय उदयसिंह सरदेसाई यांच्या कार्याबद्दल गौरव करणारे अनेकांनी विचार मांडले. पिराजी कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत अळवणी यांनी सुत्रसंचलन केले. प्रल्हाद मादार यांनी आभार मानले.