belgaum : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये टाळ वाजवत असताना वारकरी महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना कुप्पटगिरी (ता. खानापूर) येथे बुधवारी (दि. १७) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. यल्लू उर्फ बायजा यशवंत पाटील (वय ७२) असे या वारकरी महिलेचे नाव आहे.
गावातील वारकरी मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दुपारी १ वाजता दिंडी सुरू करण्यात आली होती. या दिंडीमध्ये यल्लू पाटील या सहभागी झाल्या. यावेळी टाळ वाजवत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या दिंडी मध्ये सामील होऊन आपली सेवा करत असताना त्यांनी आपला प्राण सोडला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बेळगाव वडगाव येथील तरुणाचा मृत्यू!
वडगाव सोनार गल्लीमधील एका तरुणाचे पंढरपूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सदर घटना बुधवारी (दि. १७) सकाळी दहा वाजता घडली. प्रवीण सुतार असे त्यांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, प्रवीण वडगाव परिसरातील वारकऱ्यांना घेऊन आपल्या वाहनातून पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. सकाळच्या सत्रात आपली कामे आटोपून ते आपल्या पार्क केलेल्या वाहनात बसले होते. यादरम्यान त्यांचे हृदयाघाताने निधन झाले. वारकरी दर्शन संपवून पार्क केलेल्या वाहनाकडे आल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेने वडगाव परिसरातील वारकऱ्यांवर शोककळा पसरली.