
खानापूर /प्रतिनिधी:
खानापूर व गोवा या दोन प्रांतांची जवळीक साधणारा सह्याद्रीचा घाट प्रदेश, या घाटाच्या कुशीत वसलेली किरावळे येथील श्री नवदुर्गा ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. नवदुर्गा देवीच्या या उत्सवामुळे गोव्यातील अनेक भाविक बहुसंख्येने दरवर्षी या ठिकाणी येऊन हा उत्सव साजरा करतात. त्यामुळे खानापूर तालुक्याची ही वैभव वाढले आहे. या देवीचा उत्सव असाच सदोदित कायम ठेवण्यासाठी येथील भक्तमंडळी व ट्रस्ट मंडळींनी कार्यतत्व रहावे. आपणही खानापूर तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिले. आज सोमवारी महानवमीनिमित्त किरावळे नवदुर्गा मंदिरात बारावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सकाळी 7 पासून विविध धार्मिक कार्यक्रम होम हवन, महाअभिषेक, नवचंडी हवन, कलह वृद्धी पवन असे अनेक कार्यक्रम पार पडले. याकरिता गोव्यातील शेकडो भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या नवदुर्गा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेल्या या दैवी उत्सवात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्याच पद्धतीने यावर्षीही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गोव्याचे माजी मंत्री महादेव नाईक, उद्योजक जयंत मेंटिंगकर, गोव्याच्या शिक्षण खात्यातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी दयानंद सापडेकर, नवदुर्गा ट्रस्टचे उपाध्यक्ष विजय कामत, लैला साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील, भाजप युवा नेते किशोर हेबाळकर, राजू करंबळकर यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी देणगी कुपन ड्रॉ कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सहशिक्षक चापगावकर यांनी उपस्थित त्यांचे स्वागत केले.