Home » Khanapur : केंद्रानेच ठरवावा ऊसाचा ६ हजार रुपये दर; राज्याला अधिकार नाही – सतीश जारकीहोळी

Khanapur : केंद्रानेच ठरवावा ऊसाचा ६ हजार रुपये दर; राज्याला अधिकार नाही – सतीश जारकीहोळी

Oplus_16909312

Oplus_16909312

केंद्रानेच ठरवावा ऊसाचा ६ हजार रुपये दर; राज्याला अधिकार नाही – सतीश जारकीहोळी

खानापूर : ऊसाला प्रतिटन ६ हजार रुपये दर निश्चित करण्याची मागणी होत असली, तरी हा दर निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. केंद्र सरकारनेच ऊसाचा एमएसपी वाढवून तो दर निश्चित करावा, असे स्पष्ट मत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

खानापूर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, ऊसाच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिष्टमंडळामार्फत पत्र देण्यात आले आहे. दरवर्षी एमएसपी वाढविण्याची मागणी केली जात असून, आतापर्यंत अपेक्षित वाढ झालेली नाही. मात्र, यंदा एमएसपीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांची बैठक झाल्यानंतर केंद्र सरकारने बोलावले तर आपण बैठकीला उपस्थित राहू. सध्या केंद्राकडून कोणतेही निमंत्रण आलेले नाही. साखर कारखाने आणि शेतकऱ्यांमध्ये करार झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी अद्याप वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.

एसआयआरबाबत गैरसमज निर्माण केला जात आहे

एसआयआर प्रक्रियेबाबत कोणताही गोंधळ नसल्याचे सांगत जारकीहोळी म्हणाले की, यासंदर्भात यापूर्वीच निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे. जाणूनबुजून चुकीचे अर्ज दाखल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर सात दिवसांच्या आत नोटीस देण्यात येते. आरोप सिद्ध न झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

कायद्यानुसार अर्ज दाखल करण्यासाठी स्पष्ट नियम आहेत. बीएलए-२ मार्फतही अर्ज करता येतो. अर्ज योग्य असल्यासच त्याचा विचार केला जाईल. एखाद्या पात्र मतदाराचा मतदानाचा अधिकार बाधित होत असल्यास त्यावर आक्षेप नोंदविण्याची संधी उपलब्ध आहे.

बेळगाव जिल्ह्यात एकाही पात्र मतदाराचे मतदारयादीतील नाव जाणूनबुजून वगळण्यात आलेले नाही. कोणाचे नाव राहून गेले असल्यास माहिती दिल्यानंतर ते पुन्हा समाविष्ट करता येईल. भाजपकडून अनावश्यक गोंधळ निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, भाजपने दाखल केलेले अर्ज आता परत का घेतले जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रिक्त मंत्रिपदांची लवकरच भरती

राज्यात रिक्त असलेली मंत्रिपदे कधी भरली जाणार, असा प्रश्न विचारला असता मंत्री सतीश जारकीहोळी यांनी “आदाती तितक्या लवकर मंत्रिपदे भरली जातील,” असे सांगितले.

Do Share
error: Content is protected !!
Call Us