Home » Idalhond : सापाला जंगलात सोडताना सर्पदंश; साप पकडणाऱ्या बडकू सुतारांचा दुर्दैवी मृत्यू

Idalhond : सापाला जंगलात सोडताना सर्पदंश; साप पकडणाऱ्या बडकू सुतारांचा दुर्दैवी मृत्यू

file_000000005d488211a97cff24d3e4d317

सापाला जंगलात सोडताना सर्पदंश; साप पकडणाऱ्या बडकू सुतारांचा दुर्दैवी मृत्यू

दहा वर्षांपासून सापांना सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्याचे कार्य; इदलहोंडसह परिसरावर शोककळा

खानापूर : तालुक्यातील इदलहोंड येथील श्रीराम सेना संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आणि गेल्या सुमारे दहा वर्षांपासून साप पकडण्याचे सामाजिक कार्य करणारे बडकू उर्फ सातेरी विठ्ठल सुतार (वय ३९) यांचा मंगळवारी, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. सापाला पकडून जंगलात सुरक्षितपणे सोडण्यासाठी गेले असताना ही घटना घडली. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे इदलहोंडसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बडकु विठ्ठल सुतार हे गेल्या दहा वर्षांपासून साप पकडण्याचे काम करीत होते. गावातील किंवा परिसरातील कोणाच्या घरात साप आल्याची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचून सापाला सुरक्षितपणे पकडत. त्यानंतर पकडलेला साप पोत्यात ठेवून जंगलात नेऊन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम ते नियमितपणे करीत होते.

मंगळवारीही एका ठिकाणी साप पकडल्यानंतर तो जंगलात सोडण्यासाठी सुतार गेले होते. जंगलात पोहोचल्यानंतर सापाला सोडण्यासाठी त्यांनी पोत्याचे तोंड उघडताच सापाने अचानक पलटी मारून त्यांच्या हाताला दंश केला. सर्पदंशानंतर ते जंगल परिसरातच बेशुद्ध होऊन कोसळले.

विशेष म्हणजे, साप जंगलात सोडण्यासाठी जाताना ते नेहमी कोणाला तरी सोबत घेऊन जात असत. मात्र, यावेळी ते एकटेच गेले होते.

बराच वेळ होऊनही सुतार घरी परतले नसल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना ते जंगल परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच इदलहोंड येथील माजी आमदार दिगंबरराव पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव आण्णाबाळ दिगंबरराव पाटील यांनी गणेबैल टोलनाक्याजवळील राष्ट्रीय महामार्गावरील रुग्णवाहिका तातडीने बोलावून घेतली.

रुग्णवाहिकेतून सुतार यांना उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पत्नी व पाच वर्षांच्या मुलीवर मोठे संकट

बडकू उर्फ सातेरी विठ्ठल सुतार यांच्या पश्चात पत्नी आणि पाच वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात करण्यात आली असून बेळगाव येथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

श्रीराम सेना इदलहोंड शाखेकडून श्रद्धांजली

विठ्ठल सुतार हे श्रीराम सेना संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. साप पकडण्यात त्यांना चांगले कौशल्य होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेकदा त्यांच्या मदतीचा लाभ मिळत होता.

त्यांच्या निधनामुळे श्रीराम सेना इदलहोंड शाखेने एक सक्रिय कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us