खानापूर तालुका लवकरच दुष्काळी यादीत!
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे संकेत; प्रजा सेवा आंदोलनात ३०० हून अधिक अर्ज दाखल
खानापूर तालुका लवकरच दुष्काळी यादीत?
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे संकेत; प्रजा सेवा आंदोलनात ३०० हून अधिक अर्ज दाखल
खानापूर / प्रतिनिधी : पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, लवकरच आणखी काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले जातील. त्यामध्ये खानापूर तालुक्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सोमवारी खानापूर येथे सांगितले.
खानापूर येथील लोकमान्य भवनात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रजा सेवा आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय विभागांशी संबंधित ३०० हून अधिक अर्ज व निवेदने नागरिकांनी सादर केली. अर्जांची ऑनलाईन नोंदणी करून संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी नागरिकांकडून आलेल्या अर्जांची पाहणी करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक समस्येची दखल घेऊन त्याचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, मराठी शाळांना प्राधान्य द्यावे, प्रत्येक मराठी शाळेत मराठी विषयाचा शिक्षकच मुख्याध्यापक असावा, अशा मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
तालुक्यातील मलप्रभा नदीवरील बंधारे भक्कम करावेत, शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता करून द्यावी, ऊसाला एफआरपी दर जाहीर करावा, हत्ती व इतर वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण व योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशा मागण्याही मांडण्यात आल्या.
रस्ते, जमीन मोबदला आणि शहरातील प्रश्न
खानापूर शहरातील फिश मार्केटजवळील रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा प्रश्नही आंदोलनात मांडण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी गेलेल्या जमिनीचा योग्य सर्व्हे करून जमीन कोणत्या विभागाच्या अखत्यारित येते, याची निश्चिती करावी आणि संबंधित जमीनमालकांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी राहुल सावंत, चव्हाण व मानसिंग चौगुले यांनी केली.
महसूल, परिवहन आणि घरकुलाच्या मागण्या
सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनेकर यांनी विविध प्रश्नांवर निवेदने दिली. तत्कालीन तहसीलदार रेशमा तालीकोटी यांच्याविरोधातील तक्रारीची चौकशी करावी, खानापूर क्रीडा मंडळाच्या जागेचा प्रश्न सोडवावा, जुन्या न्यायालयाच्या जागेवर शासनाचा ताबा घ्यावा, तसेच बस आगारापासून शिवस्मारक चौकापर्यंत बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्मशानभूमीची समस्या असून ती तातडीने सोडवावी, घरकुल योजनेंतर्गत गरजू कुटुंबांना घरे मंजूर करावीत, बेघरांना निवारा उपलब्ध करून द्यावा, सरकारी गायरान व इतर शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली.
खानापूर येथील केएसआरटीसीच्या जमिनीतील ३२ गुंठे जागेवरील कथित अतिक्रमण व गाळ्यांचा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.
लोकमान्य भवनात समस्यांचा पाऊस
प्रजा सेवा आंदोलनामुळे तालुक्यातील विविध भागांतील नागरिकांना आपापल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळाली. रस्ते, पाणी, वीज, महसूल, वन विभाग, परिवहन, पोलीस, ग्रामविकास, घरकुल, शेती आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित निवेदनांची संख्या मोठी होती.
एकाच ठिकाणी विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने प्रशासनाचीही धावपळ झाली. सुमारे दोन तास लोकमान्य भवन परिसरात नागरिकांची गर्दी कायम होती.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष सुनील हनमणावर, पंचहमी योजना समितीचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, जिल्हा वन संरक्षण अधिकारी एन. ए. क्रांती, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, विजयकुमार व्हनकेरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रजा सेवा आंदोलनातून नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचल्या असल्या, तरी स्वीकारलेल्या निवेदनांवर प्रत्यक्ष कार्यवाही किती लवकर होते आणि कोणत्या समस्यांचे निराकरण होते, याकडे आता खानापूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.