
जिल्हाधिकाऱ्यांची दखल; १ सप्टेंबरला खानापूर तहसीलदार व ग्रामप्रतिनिधींची संयुक्त बैठक
बेळगाव : गावातील गायरान जमीन अर्थात चराई व सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी कायदेशीर लढा सुरू केला आहे. या संदर्भात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेतली आहे.
गायरान जमिनीच्या संरक्षणासंदर्भात सादर करण्यात आलेल्या निवेदनात संबंधित जमिनीचे जतन करून ग्रामस्थांच्या सार्वजनिक हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीही या प्रश्नासंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, अपेक्षित तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीस खानापूर तहसीलदार तसेच संबंधित गावातील प्रतिनिधी व नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीत गायरान जमिनीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या कायदेशीर लढ्याला अॅड. आकाश अथणिकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गायरान जमीन ही गावाच्या सार्वजनिक हिताची असून तिचे संरक्षण होणे आवश्यक असल्याची भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावेळी ग्रामपंचायतचे माजी सदस्य बळीराम वांद्रे. पुंडलिक कोडचवाडकर, चंद्रकांत कांबळे, परसराम अगनोजी यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
आता १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त बैठकीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, या बैठकीत गायरान जमिनीच्या संरक्षणाबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
— खानापूर लाईव्ह