खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी : शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न देणारा छोटासा व्यवसाय म्हणजे दुग्ध पालन होय. पण ज्या जनावरांच्या आधारावर आपला उदरनिर्वाह भागवतो अशा गरीब शेतकऱ्यांच्या गोठ्यातील दुभती जनावरे अज्ञात रोगाचा सामना करून दगावण्याची वेळ येते त्यावेळी सदर शेतकरी हातबल होतो अशाच प्रकारे तालुक्यातील हलशी येथील महादेव निंगप्पा बावकर या शेतकऱ्यांच्या गोठ्यातील तीन म्हशी आठवड्याभरात दगावल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. टलेरिया नावाच्या अज्ञात रोगाने सदर शेतकऱ्याच्या तीन म्हशी आठवड्याभरात मृत्युमुखी पडल्या. पहिली म्हैस दगावल्यानंतर सदर शेतकऱ्याने बेळगाव व धारवाड येथील तज्ञ डॉक्टरांना बोलावून उपचाराचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या जवळपास दीड लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे. तरी या शेतकऱ्याला आता आर्थिक सहाय्यतेची गरज असून शासनाने तसेच मानवतावादी लोकांनी शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.