Home » गर्लगुंजी जिल्हा पंचायत निवडणुकीत सुमित्रा होसुरकर इच्छुक!

गर्लगुंजी जिल्हा पंचायत निवडणुकीत सुमित्रा होसुरकर इच्छुक!

file_00000000adb88211a42d0de7a6d6ae8f

गर्लगुंजी जिल्हा पंचायत निवडणुकीत सुमित्रा होसुरकर इच्छुक!

भाजपचे सक्रिय कार्यकर्ते सदानंद होसुरकर यांच्या पत्नीच्या उमेदवारीची चर्चा; महिला इच्छुकांची संख्या वाढली!

खानापूर / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी जिल्हा पंचायत मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी महिला उमेदवारांच्या इच्छुकतेची चर्चा रंगू लागली आहे. भारतीय जनता पार्टीकडून या मतदारसंघात सात ते आठ महिला उमेदवार इच्छुक असल्याची माहिती खानापूर लाईव्हला मिळाली आहे. यामध्ये झाड अंकले येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते सदानंद होसुरकर यांच्या पत्नी सुमित्रा सदानंद होसुरकर यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे.

सदानंद होसुरकर यांनी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम केले आहे. सध्या ते भाजपचे तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, यापूर्वीही पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. रयत मोर्चाच्या माध्यमातूनही त्यांनी पक्षासाठी योगदान दिले आहे.

सामाजिक कार्यातून जनसंपर्काची बांधणी

झाड अंकले आणि माळ अंकले या गावांशी होसुरकर कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सामाजिक कार्यातील सहभागामुळे या कुटुंबाची परिसरात स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. गणेबैल येथील भूतनाथ देवस्थानच्या यात्रा महोत्सवातही होसुरकर कुटुंबाचा सक्रिय सहभाग असतो.

सदानंद होसुरकर यांचा गणेबैल, निटूर, काटगाळी, गर्लगुंजी आणि इदलहोंड परिसरात जनसंपर्क आहे. सामाजिक, धार्मिक तसेच क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात. खानापूर तालुक्यातील कुस्तीचे आखाडे आणि बैलगाडा शर्यतींमध्येही त्यांची उपस्थिती असते.

त्यांच्या पत्नी सुमित्रा होसुरकर यादेखील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, महिला सोसायटीच्या माध्यमातून महिलांना संघटित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

भाजपकडून प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा

गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी केलेले कार्य आणि सामाजिक क्षेत्रातील सहभाग लक्षात घेता, भारतीय जनता पार्टीकडून आपल्या कुटुंबाला प्रतिनिधित्वाची संधी मिळेल, असा विश्वास सदानंद होसुरकर यांनी व्यक्त केला आहे.

गर्लगुंजी जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपकडून अनेक महिला उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावाला पसंती देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुमित्रा सदानंद होसुरकर यांना उमेदवारी मिळणार का, याबाबत सध्या चर्चा सुरू असून, आगामी काळात या मतदारसंघातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

गर्लगुंजीच्या राजकीय आखाड्यात महिला इच्छुकांची संख्या वाढत असताना भाजपची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us