Home » लोंडा जिल्हा पंचायत क्षेत्रात सौ. राजश्री देसाई इच्छुक!

लोंडा जिल्हा पंचायत क्षेत्रात सौ. राजश्री देसाई इच्छुक!

file_00000000510c821189530452a6679561

📰 खानापूर लाईव्ह | राजकीय विशेष वृत्त

भाजपकडे उमेदवारीची हक्काची मागणी; लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात देसाई कुटुंबातील इच्छुकांमध्ये चुरस!

खानापूर / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीचे राजकीय वारे वाहू लागले असून, जांबोटीनंतर आता लोंढा आणि गर्लगुंजी जिल्हा पंचायत क्षेत्रातील आरक्षणामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही ठिकाणी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने भारतीय जनता पार्टीच्या गोटात उमेदवारीसाठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रातून सौ. राजश्री विनय देसाई यांनी भाजपकडे उमेदवारीची हक्काची मागणी करण्याची तयारी सुरू केली आहे.

लोंढ्याचा भाजपचा गड कायम राखण्याचे आव्हान!

होनकलपासून लोंढा आणि लिंगनमठपर्यंत विस्तारलेल्या लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात ५० हून अधिक गावांचा समावेश आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने या भागात आपले वर्चस्व कायम राखले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही पक्षाचा विजय कायम ठेवण्याच्या दृष्टीने उमेदवारीची निवड महत्त्वाची ठरणार आहे.

मागील निवडणुकीत सर्वसाधारण महिला प्रवर्गातून माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांच्या पत्नी सौ. अंजना बाबुराव देसाई यांनी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यांच्या विजयामुळे या भागातील भाजपची पकड आणखी मजबूत झाली.

यापूर्वी सर्वसाधारण प्रवर्गातून पी. वाय. देसाई यांना भाजपकडून संधी मिळाली होती. त्याआधी अ वर्गातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुगुट धारवाडकर निवडून आले होते. त्यामुळे लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्राला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

राजश्री देसाईंचा हक्काचा दावा!

सौ. राजश्री विनय देसाई या यापूर्वी लोंढा तालुका पंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. २०१४ ते २०१६ या कालावधीत त्यांनी सभापतीपदाची जबाबदारीही सांभाळली. पक्षसंघटना मजबूत करणे, महिला कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, यावर त्यांनी भर दिल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

स्वर्गीय माजी आमदार प्रल्हाद रेमानी यांच्या काळापासून आपण भाजपशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी काम केले आहे. मागील निवडणुकीत पक्षाचा आदेश मानून सौ. अंजना देसाई यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि त्यांच्या विजयासाठीही प्रयत्न केले. त्यामुळे आता पक्षाने आपल्या कार्याची दखल घेऊन उमेदवारीची संधी द्यावी, अशी अपेक्षा राजश्री देसाई यांनी व्यक्त केली आहे.

मोहिशेत परिसरातील जनसंपर्काची ताकद!

राजश्री देसाई यांचे सासरे अनंतराव देसाई हे मोहिशेत परिसरातील ज्येष्ठ नेतृत्व म्हणून परिचित आहेत. ग्रामपंचायत स्तरावर दीर्घकाळ त्यांनी नेतृत्व केले असून, परिसरातील अनेक गावांमध्ये त्यांचा जनसंपर्क असल्याचे सांगितले जाते. कापोली आणि घोटगाळी परिसरातही देसाई कुटुंबाचा प्रभाव असल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.

राजश्री देसाई यांचे पती विनय देसाई हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. भाजपचे समर्थक म्हणूनही परिचित आहेत. स्थानिक युवकांशी असलेला संपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे आणि नागरिकांच्या प्रश्नांमध्ये सहभाग या बाबी उमेदवारीच्या दावेदारीत महत्त्वाच्या ठरू शकतात.

अंजना देसाई पुन्हा इच्छुक; भाजपसमोर पेच!

दुसरीकडे, माजी जिल्हा पंचायत सदस्य सौ. अंजना बाबुराव देसाई यादेखील लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रातून पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकाच पक्षातून दोन महिला इच्छुक समोर येण्याची शक्यता असून, उमेदवारीवरून पक्षांतर्गत चुरस वाढू शकते. बाबुराव देसाई हे तालुका पातळीवरील एक सक्रिय हिंदुत्ववादी नेतृत्व आहे. त्यांची पकड लोंढ्या बरोबरच जांबोटी भागातही तितकीच मजबूत आहे.

लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात विविध जाती-धर्मांचे मतदार असून, देसाई कुटुंबाशी संबंधित अनेक गावांमध्ये दोन्ही बाजूंचे संपर्क आणि प्रभाव महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याचबरोबर लिंगनमठ परिसरातील मतांचे समीकरण, स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका आणि मतदारांचा कल यांचाही उमेदवारी निवडताना विचार करावा लागणार आहे.

आता भाजप कोणाला देणार संधी?

एका बाजूला मागील निवडणुकीतील विजयाचा अनुभव असलेल्या सौ. अंजना देसाई, तर दुसऱ्या बाजूला पक्षासाठी दीर्घकाळ काम केल्याचा दावा करणाऱ्या सौ. राजश्री देसाई अशी संभाव्य लढत उमेदवारीच्या टप्प्यावरच चर्चेचा विषय बनली आहे.

लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात भाजपचा झेंडा पुन्हा फडकविण्यासाठी पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखवणार? राजश्री देसाई यांच्या निष्ठेची दखल घेत त्यांना संधी मिळणार, की अंजना देसाई यांच्यावरच पुन्हा विश्वास व्यक्त केला जाणार? याकडे आता खानापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खानापूर लाईव्ह — स्थानिक राजकारणाचा अचूक वेध!

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us