नंदगडच्या कबड्डी स्पर्धेत ताराराणीच्या मुलींचा डंका!
नंदगडच्या कबड्डी स्पर्धेत ताराराणीच्या मुलींचा डंका!
दमदार खेळाच्या जोरावर उपविजेतेपदासह ११ हजारांचे पारितोषिक; पल्लवी पाटील हिचा विशेष पुरस्काराने गौरव
खानापूर / प्रतिनिधी : नंदगड येथील तरुण क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ६७ व्या भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेत मराठा मंडळ संचलित म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महिला विभागात उपविजेतेपद पटकावले. या यशाबद्दल संघाला आकर्षक चषक आणि रोख ११ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत एकूण १० नामांकित संघांनी सहभाग घेतला होता. ताराराणीच्या मुलींनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर आपला दबदबा निर्माण केला.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ताराराणीच्या संघाचा सामना गदग-केळगेरी येथील बलाढ्य राष्ट्रीय संघाशी झाला. या सामन्यात ताराराणीच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाला दोन वेळा ऑलआउट करत २७-७ अशा मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या सामन्यात बेळवट्टी संघाचा २३-१८ अशा फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात सांगलीच्या तुल्यबळ संघाविरुद्ध ताराराणीच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत झुंजार लढत दिली. मात्र, अटीतटीच्या सामन्यात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत कुमारी पल्लवी पाटील (कुपटगिरी) हिने विशेष चमक दाखवत सर्वप्रथम पकड करण्याचा मान मिळवला. याबद्दल माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. पुंडलिक कारलगेकर यांनी जाहीर केलेले रोख ११०० रुपयांचे विशेष पारितोषिक तिने पटकावले.
या यशस्वी संघात दिव्या शिरोडकर (शिवठाण), पल्लवी पाटील (कुपटगिरी), रेणुका गुरव (गणेबैल), कार्तिकी लोकुळोचे (धामणे) आणि धनश्री भोसले (लालवाडी) या खेळाडूंचा समावेश होता.
मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनी क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. या यशाबद्दल संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील, श्री. परशराम गुरव, प्राचार्य अरविंद पाटील आणि मुख्याध्यापक श्री. राहुल जाधव यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
तसेच खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक प्रशांत पांखरे आणि भीमसेन यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक करण्यात आले.
शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातही यशाची भरारी घेणाऱ्या ताराराणीच्या मुलींनी खानापूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.