खानापूर / प्रतिनिधी:
खानापूर येथील मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूल खानापूर च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या विज्ञान वस्तू प्रदर्शनात भाग घेऊन दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
विजयवाडा आंध्र प्रदेश येथे दि. 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान वस्तू प्रदर्शनात खानापूर येथील मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूल मध्ये इयत्ता दहावी वर्गात शिकत असलेले विद्यार्थी कुमार आकाश रामचंद्र पाटील आणि कुमार बसवांनी लक्ष्मण कुकडोळी या विद्यार्थ्यांनी या शाळेचे विज्ञान विषयाची सहशिक्षक श्री एस एम मुतगी यांच्या मार्गदर्शनाखाली भाग घेतला होता. असंप्रदायिक पद्धतीने ऊर्जा निर्मिती कशी करता येईल याविषयी विज्ञान प्रकल्प सादर केला होता.
या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतामधून 185 हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपले विज्ञान प्रकल्प सादर केले होते. सदर प्रकल्पामधून मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाला अतिविशेष प्रकल्प म्हणून निवडण्यात आले आहे. यापूर्वी हा प्रकल्प खानापूर तालुका येथे झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवडण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा पातळीवरही या प्रकल्पाला प्रथम क्रमांक देण्यात आला होता. तदनंतर राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या विज्ञान वस्तू प्रदर्शनात या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला होता व त्यानंतर संपूर्ण भारतात घेण्यात आलेल्या देश पातळीवरील घेण्यात आलेल्या विज्ञान वस्तू प्रदर्शनात हा प्रकल्प सादर करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार आपल्या हायस्कूलचे विज्ञान शिक्षक या दोन विद्यार्थ्यांना घेऊन विजयवाडा आंध्र प्रदेश येथे हा प्रकल्प सादर केला होता. तेथील परीक्षकांनी 185 प्रकल्पामधून अतिविशेष प्रकल्प म्हणून सदर प्रकल्पाला निवडण्यात आले आहे. ही निवड म्हणजे बेळगाव शिक्षण संस्थेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आहे. यामुळे संपूर्ण मराठा मंडळ शिक्षण संस्था कडून व खानापूर तालुक्यातून सदर विद्यार्थी व विज्ञान शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. हा प्रकल्प सादर करण्यासाठी हायस्कूलचे विज्ञान शिक्षक श्री एस एम मुतगी सर यांनी परिश्रम घेतले आहेत. तर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री के व्ही कुलकर्णी यांची प्रेरणा लाभली आहे. तर मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती राजश्री नागराजू मॅडम व संचालक श्री परशुराम अण्णा गुरव आणि श्री शिवाजीराव पाटील यांचे प्रोत्साहन लाभले आहे.