खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद ध्यानात ठेऊन खानापूर तालुक्यातील बहुजन समाजाच्या मुलींना शिक्षणाचे धडे उत्तमरीत्या गिरवण्यासाठी मराठा मंडळाचे तात्कालिन अध्यक्ष मान. कै श्री. नाथाजीराव हलगेकर यांच्या दूरदृष्टीतून व स्थानिक संचालक मंडळाच्या सहकार्यातून खानापूर तालुक्यात पहिले मुलींचे कला व वाणिज्य पदवीपूर्व महाविद्यालय 1992- 93 साली स्थापन झाले. सन 1994 साली या पदवीपूर्व महाविद्यालयाची बारावीची पहिली बॅच बाहेर पडली.
समाजातील वंचित व आर्थिक दुर्बल डोंगराळ परदेशातील मुलींनी निसंकोचपणे शिक्षण घ्यावे. हा मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा हेतू होता. आणि तो हजारोंच्या संख्येने प्रवेश घेऊन साध्य केल्याचे चित्र स्पष्ट आहे. ज्या काळात 10 वी नंतरच्या शिक्षणाचे दरवाजे बंद होते. बेळगाव सारख्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणे परवडत नव्हते. अशा परिस्थितीत मराठा मंडळ शिक्षण संस्थेने उचललेले पाऊल धाडसाचेच म्हणावे लागेल. आज या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातून अनेक विद्यार्थिनींनी ताराराणीच्या ऐतिहासिक नावाप्रमाणेच झळाळी सर्वत्र निर्माण केलेली आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबर क्रीडा, कला व संस्कृतिक क्षेत्रामध्ये आपला रुबाब कायम ठेवला आहे.
साहसी बाणा व कष्ट करण्याची सवय असल्यामुळे येथील विद्यार्थिनींनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखविली आहे. याचबरोबर गेली कित्येक वर्षे येथील विद्यार्थिनींनी बारावीच्या वार्षिक परीक्षेत कला आणि वाणिज्य विभागात तालुक्यात पहिला येण्याची परंपरा कायम राखून ठेवलेली आहे.
डॉक्टर राजश्रीताई नागराजू यांनी सन 2005 पासून मराठा मंडळाच्या अध्यक्षस्थानी विराजमान आहेत. कल्पक व कर्तव्यदक्ष अध्यक्षा म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. म्हणूनच मराठा मंडळ शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी चौफेर प्रगती साधली आहे. शिक्षणाबरोबरच अध्यक्षा डॉ राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाभिमुख अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबविले गेले आहेत.
ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनी आज अनेक क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करून आहेत. काहींनी व्यावसायिकतेची कास धरली, काही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये , काही एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये , काही भारतीय सैन्यात तर काही लहान- सहान उद्योग व नोकऱ्या करीत आहेत. देश – परदेशातही काहींनी चमक दाखवली आहे व मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
अशा या आपल्या लाडक्या विद्यार्थिनी सर्वत्र विखुरलेल्या आहेत. अशा विद्यार्थीनी एकत्र याव्यात पुन्हा एकदा काॅलेजच्या आवारात त्यांच्या आनंदाला उधाण यावे. गतकाळातील आठवणी ताज्या व्हाव्यात, एकमेकांना भेटावं, आदर, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे रेशमी बंध अधिक मजबूत व्हावेत यासाठी प्रयत्न पूर्वक भव्य अशा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्याचा मनोदय असून या मेळाव्याचे पूर्व नियोजन करण्यासाठी रविवार दिनांक. 10 नोव्हेंबर 2024 रोजी ठीक 10 वाजता म. मं. ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालय खानापूर येथे 1993 पासून शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थिनींची बैठक होणार असून बहुसंख्य विद्यार्थ्यांनीनी या बैठकीला उपस्थित राहून हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यास उपकृत करावे.
अधिक माहितीसाठी
प्रा. मंगल देसाई 9945852021
प्रा.टी.आर.जाधव 9380815706
प्रा. मनीषा एलजी 9964938805
यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन प्राचार्य व प्राध्यापक वर्गाने केले आहे.