डोकीवर फेटा, कपाळी चंदनाचा टिळा, हातात विना, अन पगडी नेसून कीर्तनात रंगणारा माझे दादा , जनु संत तुकारामच._
1992 मध्ये माझे आजोबा देहवसान झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या एकुलत्या माझ्या दादांनी अनेक कटू प्रसंग झेलले. त्याकाळी पांडुरंगाच्या लीन होऊन वारकरी बनले. तब्बल 30 वर्षाची वारकरी सेवा बजावून आपण अनंतात विलीन झालात. असे थोर विचारवंत , चापगाव येथील ज्येष्ठ वारकरी, कुटुंबाचे प्रेरणास्थान माझे दादा.. ह भ प श्री मष्णू हनुमंत कुऱ्हाडे (वय 80)यांचे दि. 15 ऑक्टोंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
खरंतर, गावातील दुसऱ्या फळीतील वारकऱ्यांच्या रांगेत असणारे माझे वडील तेव्हापासून समाजसेवेत उतरले. गावात सार्वजनिक कामे ,मंदिरांचे जीर्णोद्धार करण्यासाठी ते कधीच मागे राहिले नाहीत. पंढरपूर सारख्या ठिकाणी गावची स्वतःची जागा राहावी यासाठी गावातील काही वारकऱ्यांनी एकसंघ होऊन त्या ठिकाणी जागा घेण्याचे धाडस केले. याची महत्त्वाची जबाबदारी ही पेलली. *एक उत्तम अभ्यासू, समाज प्रबोधनकार, चांगल्या गुणांचा संदेश देणारे, ऊर्जा देणारे, व इतिहासाची पाने आठवण त्यातून अनेकांना प्रबोधन करणारे होते.* त्यांचे उपदेश काहीना, कटू लागायचे. मात्र मार्मिक असायचे. बालपणी हलाखीची परिस्थिती असतानाही शिक्षणाची आस त्यांना होती. पण त्या परिस्थितीत त्यांना उच्च शिक्षण घेता आले नाही म्हणून त्यांनी मुलांना शिक्षित बनवण्याचा प्रयत्न केला.
जीवन हे सुख दुःखाने भरलेल्या अथांग समुद्रासारखे आहे . दुःखे बाजूला सरून सुखाचा मार्ग धरण्यासाठी अनेकांची धडपड असते. लहानपणापासून काबाड कष्ट करून जीवन जगण्याची जिद्द ही वेगळीच असते. अशाच जीवनशैलीत लहानपणापासून आजोबाच्या खांद्यावर वाढलेल्या एकुलत्या दादांनी अनेक संकटे झेलली. उपजीविकेसाठी लागणारी शेतीवाडी नसतानाही सावकारीच्या विळख्यातून ती सोडवण्याची केवीलवाणी धडपड. अनेक वेळा उपाशीपोटी झोपून केलेला संघर्ष, हा माझ्या बालपणीतल्या आठवणी आजही डोळ्यासमोर येतात.
क***** मातीत त्यांचे गाळणारे घाम , त्यांचा कष्टाळूपणा डोळ्यासमोर येतो . जसे जसे आम्ही लहानाचे मोठे होत गेलो, तशी जबाबदारीची कावड वडिलांनी आम्हा दोन लेकरांच्या हाती दिली. वडिलांनी दिलेली शिकवण ही तंतोतंत पाळत आम्हीही तितक्याच कटाक्षाने जीवन जगण्याचे धाडस केले. मुलांनी शिक्षित व्हावे, यासाठी पायांच्या पोटरीवर दिलेले मार, शिक्षणासाठी दिलेली धमक ही आमच्या जीवनाची गुरुकिल्ली ठरली. म्हणून आज समाजात त्यांच्या शिक्षणाच्या प्रेरणेतूनच ताट मानेने जगण्यासाठी धैर्य येते. एकीकडे शेतीवाडी वाचवण्याची धडपड असताना मुलांना शिकवण्याची जिद्द माझ्या वडिलांनी जाणली. हालाकीचे प्रसंग असतानाही शिक्षण दिले. प्रेरणा ऊर्जा दिली. कुटुंबाचा रणगाडा सांभाळताना येणारे अनेक कटू प्रसंग त्यानी हातोहात हाताळले. नियतीचा काल बदलला, तारुणीतल्या अपघातातील मुखा मार उफाळला आणि वडिलांना दीर्घ आजाराने घेरले. ते सावरलेच नाहीत. अखेरच्या श्वासापर्यंत केवळ मुखी पांडुरंगाचे नाम घेतले. प्रत्येकाला आईबाप हे प्रेरणादायी व मोठा आधारवड असतात. पण दुःखातून सुखाच्या वाटेवर जाताना मात्र त्यांचे आशीर्वाद शेवटपर्यंत हवेसे वाटतात. पण नशीब तोटकेच. अशा या ब्रह्मांडारुपी सावली असलेल्या बापाच्या जाण्याने आम्हा परिवारावर जी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरून न येणारी.
दादा ,आपण जरी देहरूपाने आपल्यातून नसाल तरी अंतर्मनाने मात्र तुम्ही नेहमीच आम्हाला प्रेरणा देत तुमचा आशीर्वाद सदैव राहावा.
दादा , आजच्या अकराव्या दिनी तुम्हास भावपूर्ण श्रद्धांजली.
रविवारी तेरावा निमित्त..
शुक्रवारी स्वगृही चापगाव येथे अकराव्या दिनी उत्तर कार्य झाल्यानंतर तेरावा दिवस म्हणून रविवार दि. 27 रोजी आयोजिला आहे. या निमित्त सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत प्रवचन, नामस्मरण नामजप व कीर्तन कार्यक्रम आयोजिला आहे. व त्यानंतर गोड भोजन आयोजिले आहे. तरी आपण सर्वांनी माझे स्नेही म्हणून उपस्थित राहून उपकृत करावे ही विनंती.
आपलाच ..
*श्री पिराजी कुऱ्हाडे, (पत्रकार) व परिवार चापगाव*