खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी :
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न तारीख पे तारीख वाढत चालला आहे. सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नसंदर्भात एकदाही सुनावणी झाली नाही. यासाठी दोन्ही राजांच्या बेंच ऐवजी तिराईत राज्याचे न्यायाधीश नेमणूक करून सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीसह सीमा वर्गातील घटक समित्यांच्या वतीने माननीय शरद रावजी पवार यांच्याकडे कोल्हापूर दौऱ्याप्रसंगी केली आहे.
खानापूर, बेळगांव आणि निप्पाणी घटक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापूर दौऱ्यावर आलेले देशाचे नेते माजी कृषिमंत्री तसे माजी संरक्षणमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदरावजी पवार यांची भेट घेतली. यावेळी सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात २००४ पासून आजपर्यंत प्रलंबित आहे, २०१७ पासून आतापर्यंत एकदाही या केसची सुनावणी झाली नाही. तीन बेंचचे कोर्टामध्ये एकदा कर्नाटकाचे न्यायाधीश उपस्थित असतात तर एकदा महाराष्ट्राचे, हे कारण देत आजपर्यंत तारखा पडत आलेल्या आहेत. यापुढील दोन्ही राज्यांच्या बेंच ऐवजी तिर्हाईत राज्यांचे न्यायाधीश नियुक्त करून ही सुनावणी लवकरात लवकर घ्यावी व कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्न त्वरीत निकालात काढावा अशी विनंती करण्यात आली. गेली ६६ वर्षे सीमाभागातील जनता कन्नडीगांच्या वरवंट्याखाली भरडली जात आहे, याच्यातुन मुक्तता करण्यासाठी आपणच सीमाभागाचे आधारस्तंभ आहात. तरी आपण लवकरात लवकर यांमध्ये लक्ष्य घालून उच्चाधिकार समितीची बैठक बोलावून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्या करवी या दाव्याला गती द्यावी अशी विनंती सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यांवर पवार साहेबांनी सीमावासीयांना आश्वस्त केले आणि मुंबईला जाताच तत्काळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्चाधिकार समितीची त्वरित बैठक घेऊन यांवर त्वरित हालचाल करण्यात येईल असे आश्वासन दिले. याचे नेतृत्व खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री दिगंबरराव पाटील यांनी केले. यावेळी शिष्टमंडळामध्ये समितीचे कार्याध्यक्ष श्री मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष श्री निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री आबासाहेब दळवी, सहचिटणीस श्री रणजीत पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री जयराम देसाई, रविंद्र शिंदे, मध्यवर्ती म ए समिती सदस्य श्री कृष्णा मल्लाप्पा कुंभार, उपाध्यक्ष श्री कृष्णा मन्नोळकर, बेळगांवचे माजी जिल्हा पंचायत सदस्य मोदगेकर, निप्पाणी भागातील म ए समिती सदस्य उपस्थित होते.