Oplus_16908288
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
विज्ञान आणि तंत्रज्ञानाने माणसाचे जीवन व्यापले आहे. नवीन शोध आणि संशोधनामुळे जगणे सुखकर झाले आहे. शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांनी जगावर केलेले उपकार विसरता येण्यासारखे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लावण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे शिक्षण देणे गरजेचे आहे. कौशल्यपूर्ण पिढी घडविण्यासाठी मंदिरांइतकीच ज्ञान मंदिरेही आवश्यक आहेत. असे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले.
खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘सायन्स ऑन व्हील’ आणि वर्चुअल लॅब हा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विज्ञान प्रदर्शनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा येथील शांतीनिकेतन शाळेत आमदार हलगेकर यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला.
पुणेस्थित खानापूरकर उद्योजकांच्या बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये हे फिरते विज्ञान प्रदर्शन भरविले जात आहे.
महाराष्ट्र राज्य सायन्स अँड व्हील उपक्रमाचे समन्वयक, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पांडुरंग काकतकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, विज्ञान विषयामुळे जिज्ञासू व चिकित्सकवृत्ती वाढीस लागते. शिक्षण खाते व सरकारच्या मदतीने तालुक्यात अध्ययावत असे सायन्स सेंटर सुरू केल्यास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी शिक्षण प्रेमींनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
गटशिक्षणाधिकारी पी. रामाप्पा यांनी देशाच्या प्रगतीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे योगदान मोलाचे असून तंत्रज्ञान साक्षर माणूस घडविण्यासाठी शालेय पातळीपासून प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
बीपीएल फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता भेकणे, उपाध्यक्ष नामदेव पाटील, सचिव प्रशांत गुंजीकर, बीआरपी अधिकारी एम. जी. हत्ती, मध्यान्ह आहार योजना अधिकारी व्ही. ए. जकाती, ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्राच्या पल्लवी पराडकर, गोवा सायन सेंटरचे भूषण राऊत, गुलबर्गा सायन्स सेंटरचे अमरय्या बेळमगी, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील चिगुळकर, शंकर कम्मार आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सूत्रसंचालन मुख्याध्यापक महेश सडेकर तर आभार सुनील चीगुळकर यांनी मांडले.
तालुक्यातील 14 माध्यमिक शाळा उपक्रमाला प्रतिसाद : गोवा सायन सेंटर, ज्ञान प्रबोधनी सायन्स सेंटर महाराष्ट्र, तथा गुलबर्गा रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील 14 माध्यमिक शाळांमध्ये गेल्या तीन नोव्हेंबर पासून फिरते विज्ञान प्रदर्शन आयोजित करून शाळेतील मुलांना वैज्ञानिकतेची झलक दाखवून वेगवेगळी अनुभूती देण्याचा प्रयत्न केला त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला.