
तोपिनकट्टी सरकारी मराठी शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा : नूतन एसडीएमसी सदस्यांचा सत्कार
फोटो : तोपिनकट्टी : पत्रकार वासुदेव चौगुले यांचा सत्कार करताना एसडीएमसी अध्यक्ष हुवाप्पा गुरव, हणमंत खांबले, मुख्याध्यापिका हेलन परेरा, पिराजी पाखरे व इतर.
खानापूर लाईव्ह /प्रतिनिधी:
ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत शिक्षण घेणारी मुलेच जगाच्या स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देऊ शकतात. आई-वडिलांच्या चटक्यांची जाणीव त्यांना संघर्षाचे बाळकडू पाजते. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या घरी जन्मलो याची लाज न बाळगता, अभिमान बाळगा. संकटांचा संयमाने सामना करताना जिद्द आणि चिकाटी ठेवा. जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल असा सल्ला पत्रकार वासुदेव चौगुले यांनी विद्यार्थ्यांना दिला.
तोपिनकट्टी (ता. खानापूर) सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा सोहळा आणि नूतन एसडीएमसी सदस्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसीचे अध्यक्ष हुवाप्पा गुरव होते. मुख्याध्यापिका हेलन परेरा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, मातृभाषेतील शिक्षण मुलांचा सर्वांगीण विकास घडवून आणते. समज आणि आकलनाची क्षमता विकसित होण्यास मातृभाषेतील ज्ञान उपयोगी ठरते. याची जाणीव ठेवून पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतूनच शिकविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेच्या वतीने नूतन एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपाध्यक्ष सरस्वती गुरव, सदस्य हणमंत खांबले, मल्लेशी तीरवीर, जोतिबा होसुरकर, जोतिबा बेकवाडकर, संतोष करंबळकर, परशराम गुरव, सोनाली पाटील, पूजा गुरव, मनीषा बांदिवडेकर, गीता हलगेकर, मलप्रभा सुतार, भीमसेन करंबळकर आदी उपस्थित होते. पिराजी पाखरे यांनी सूत्रसंचालन केले.