खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्या भारती, कर्नाटक या संस्थेतर्फे बेळगांव जिल्ह्यातील सदर संस्थेशी संलग्न असलेल्या शिक्षण संस्थांसाठी जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन खानापूर येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेत मंगळवार दिनांक २२/०८/२०२३ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४:३० या वेळेत करण्यात आले आहे. सकाळी १० ते ११:३० या वेळेत उदघाटन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. उदघाटन डॉक्टर जायाप्पा मंजन्ना, रसायन शास्त्र प्राध्यापक, राणी चनम्मा विद्यापीठ, बेळगांव यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर गट शिक्षणाधिकारी सौ.राजश्री कुडची व विद्या भारती प्रांत अध्यक्ष श्री परमेश्वर हेगडे व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी वर्गाला विज्ञान व संशोधनात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने सदर प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता चेतन अरुण मणेरीकर व संचालक श्री सदानंद कपिलेश्वरी यांनी सांगीतले. दुपारी २ ते ४:३० या वेळेत पालकवर्ग व इतर शाळेच्या विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येईल असे आयोजकांनी कळविले आहे.