खानापूर: शाळांच्या विकासासाठी शाळा सुधारणा कमिटीने पुढाकार घेणे आवश्यक असून गावागावात बैठका घेऊन मराठी शाळांमध्ये विद्यार्थी वाढावेत यासाठी प्रत्येक पालकांना भाषेचे महत्व व शाळेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे असून भविष्यात या शाळा जगण्यासाठी पालकांची जबाबदारी महत्त्वाची असे मत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने गुरुवारी खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी, नागुर्डा, नागुर्डा वाडा, शेडेगाळी, हारुरी, ढोकेगाळी, कौंदल येथील सरकारी मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी नागुर्डा येथील शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई होते. प्रारंभी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व इशस्तवन सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी समितीने सातत्याने आवाज उठवल्यामुळे मराठी शाळा आणि या भागातील संस्कृती टिकून आहे. प्रत्येक गावात मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याची चर्चा होत असली तरी काही गावांचा अपवाद वगळता तालुक्यातील 80 टक्के मराठी शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ज्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे किंवा शाळांमध्ये इतर प्रकारच्या समस्या आहेत. अशा शाळांबद्दल शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करुन शाळांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे अशी माहिती दिली.
निरंजन सरदेसाई, बेळगाव युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, तालुका समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, युवा समितीचे सचिव श्रीकांत कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. युवा समितीतर्फे खानापूर तालुक्याच्या विविध भागातील शाळाना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात आहे युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शाळानी विद्यार्थ्यांची पटसंख्या युवा समितीकडे दिली आहे. ज्या शाळांनी अद्याप माहिती दिली नाही त्यांनी युवा समितीशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन यावेळी युवा समितीतर्फे करण्यात आले आहे.
शैक्षणिक साहित्य वितरण करतेवेळी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष दुर्गेश महाजन, रेणुका चापगावकर, शिवानी पाटील, प्रकाश चापगावकर, दीपक कांबळे, युवा समितीचे उपाध्यक्ष राजू कदम, आनंद पाटील यांच्या सह इतर उपस्थीत होते.