खानापूर/ प्रतिनिधी:
17 जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून सीमा भागात पाळला जातो. सीमा प्रश्नाच्या लढ्यात अनेक हुतात्म्यानी आपले बलिदान दिले आहे त्यामुळे या दिनी खानापूर येथील स्वर्गीय नागापा होसुरकर स्मारकाजवळ अभिवादन केले जाते. यानुसार या वर्षीही स्वर्गीय नागाप्पा होसुरकर यांच्या स्मारका जवळ तालुक्यातील तमाम मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे व 17 जानेवारी हा दिवस कडकडीत हरताळ पळून हुतात्म्यांना अभिवादन करावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या दिनानिमित्त खानापूर शहरात सोमवारी परिपत्रके वाटप करण्यात आली. यावेळी खानापूर तालुका मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, चिटणीस आबासाहेब दळवी, माजी सभापती मारुती परमेकर, समितीने ते गोपाळराव देसाई, प्रकाश चव्हाण, विठ्ठल गुरव, राजाराम देसाई, जयराम देसाई, लक्ष्मण कसरलेकर, पुंडलिक पाटील, कृष्णा मनोळकर यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हापूरला धरणे आंदोलनात सहभागी होणार!
17 जानेवारी हुतात्मा दिनाचे अवचित साधून सकाळी नऊ वाजता स्टेशन रोड खानापूर येथील हुतात्मा कै.नागापा होसुरकर स्मारकाला अभिवादन केल्यानंतर सकाळी अकरा वाजता वरदे पंप खानापूर येथे सर्व कार्यकर्त्यांनी जमा व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता कोल्हापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. या कार्यक्रमात सीमा भागातील बहुसंख्य कार्यकर्ते जाणार आहेत. या कार्यक्रमातही खानापूर तालुक्यातील बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.