खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
बेळगाव -पणजी राष्ट्रीय महामार्गावरील गणेबैल टोलनाक्यावरील टोल वसुली प्रकरणावरून वाद चिरघळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील यांनी आपल्या वाहनाचा मासिक पास असतानाही केवळ फास्टट्रॅक अकाऊंटवर रक्कम कमी असल्याच्या कारणावरून गाडी अडवल्याने तेथेच तब्बल 24 तास आपले वाहन टोल नाक्यावर सोडून न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. संतप्त झालेल्या जमावाने टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. व टोल प्लाझा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदाराविरोधात खानापूर पोलीस स्थानकात यांनी तक्रार दाखल केली. व पुन्हा उद्या गुरुवार दि. 3 ऑक्टोंबर रोजी टोलनाका विरोधात रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी तहसीलदार तसेच खानापूर पोलिसांना निवेदन सादर करून रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
या निवेदनात राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट असताना तसेच महामार्गात जमिनी गेलेल्यांना योग्य मोबदला मिळाला नसताना टोल प्लाझा उभारून त्या ठिकाणी या भागातील नागरिकांची लूट केली जात असल्याची तक्रार केली आहे. याची वरिष्ठांनी चौकशी करून राष्ट्रीय महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर तसेच जमीन गेलेल्या लोकांना योग्य मोबदला मिळाल्यानंतरच या टोलची प्रक्रिया हाती घेण्यात यावी. तसेच आपल्या वाहनाचा पास असून देखील अडवणी केल्याबद्दल याची चौकशी करून टोल प्लाझाच्या कंत्राट दरावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे. त्यासाठी खानापूर शहर परिसरातील वाहनधारकांनी या रास्ता रोको आंदोलनात बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन के. पी. पाटील यांनी केले आहे
टोल प्लाजा कंपनीकडून पोलिसात तक्रार!
दरम्यान टोल प्लाझा च्या कंत्राटदाराने या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करून के.पी. पाटील यांच्यविरोधात खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून आपल्या कामकाजात अडथळा आणून आपणाला शिवीगाळ केल्याचा आरोप करून तक्रार दाखल केल्याचे समजते. त्यामुळे असंतोष निर्माण झाला असून , एकूणच टोल प्लाजा प्रकरण हे चिरगळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परस्पर पोलीस स्थानकात तक्रार झाल्याने दि. 3 रोजी आयोजित रास्ता रोको आंदोलन व पोलीस स्थानकातील तक्रारी याबाबत काय निकष होणार? याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.