खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
बेळगाव पणजी व्हाया चोर्ला मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बुधवारी रात्री एकच्या सुमारास चिखले वळणावरील उतारावर दोन बारा चाकी अवजड वाहनांची खड्डे चुकवण्याच्या नादात समोरासमोर धडक झाल्याने रात्रीपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
गोव्याकडून एक अवजड वाहन व बेळगाव कडून जाणारे एक अवजड वाहन दोघेही पडलेले खड्डे चुकवण्यासाठी प्रयत्न करत असताना एका अवजड वाहनाची जोरात धडक बसल्याने हा अपघात घडला. यामुळे दोन्हीही वाहने भर रस्त्यावरच अडकल्याने रात्रीपासून लहान चारचाकी वगळता मोठी सर्व वाहने या मार्गावरील येणे जाणे ठप्प झाले आहे. त्यामुळे दुथर्पा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी याबाबत पोलीस स्थानकाला माहिती मिळतात पोलिसांनी जाऊन त्या ठिकाणी रस्त्यावर अडकलेली वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केला. पण दोन्ही अवजड वाहने भर रस्त्यावरच अडकल्याने ती हटवण्यासाठी सकाळपासून प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात एका वाहनाच्या चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला बेळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.