

नंदगड : बैठकीत मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी श्रवण नाईक, आमदार विठ्ठल हलगेकर, डीवायएसपी रवी नाईक.
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
नंदगड येथे १२ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर, बुधवार दि. ५ रोजी नंदगड येथील ग्रामपंचायत कार्यालयात, आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्वतयारी व आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रांताधिकारी श्रवण नाईक, तहसीलदार प्रकाश गायकवाड, ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, यात्रा कमिटी अध्यक्ष सुभाष पाटील, डीवायएसपी रवी नाईक, पीआय सी. एस. पाटील, केएसआरटीसी, हेस्कॉम, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पशुवैद्यकीय व इतर खात्याचे अधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर व उपजिल्हाधिकारी श्रवण नाईक यांनी, केएसआरटीसी खानापूर डेपोचे मॅनेजर संतोष कांबळे यांना यात्रा काळात बसची व्यवस्था, सुरळीत करण्याबद्दल सूचना दिल्या.

बेळगाव, खानापूर तसेच तालुक्यातील मुख्य भागातून बेट बससेवा, यात्रा काळात सुरू करण्यात येतील अशी ग्वाही डेपो मॅनेजर संतोष यांनी दिली. हेस्कॉम खात्याचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर जगदीश मोहिते यांना यात्रा काळात विद्युत पुरवठा व्यवस्थित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अग्निशमन दलाला एका ठिकाणी जागा देण्यात येणार असून, त्या ठिकाणी अग्निशमनच्या गाड्या थाबण्याची व्यवस्था करणार आहे. आरोग्य विभागालाही नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात विविध सूचना देण्यात आल्या
यात्रा काळात भाविकांना व ग्रामस्थांना पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात आले. यावेळी झालेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी नंदगडचे ज्येष्ठ नेते पी. के. पाटील, पीएलडी बँकेचे माजी चेअरमन विजय कामत, लक्ष्मण बोटेकर, शंकर सोनोळी, ग्रामपंचायत सदस्य, नंदगड यात्रा कमिटी सदस्य उपस्थित होते.