बेळगाव / प्रतिनिधी:
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी खासदार रमेश कत्ती यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाचा शुक्रवारी राजीनामा दिला आहे त्यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणातील अंतर्गत मतभेद याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एकूण 17 संचालक आहेत. यापैकी काही सदस्यांचे , अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या विरोधात गटबाजीचे राजकारण होत असल्याचे दिसून आल्याने अध्यक्ष रमेश कती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे असे समजते. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक माजी खासदार अण्णासाहेब ज्योले व माजी खासदार रमेश कत्ती यांच्यात उमेदवारीवरून चढाओढ निर्माण झाली होती. नंतर माजी खासदार अण्णासाहेब जोले यांचा पराभव झाल्यानंतर जिल्हा बँकेवर याचा अंतर्गत परिणाम होऊन गटबाजीच राजकारण झाले. त्यामुळे नुकताच झालेल्या जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेनंतर एकूण 17 पैकी 13 ते 14 संचालकांची एक गुप्त बैठक होऊन अध्यक्ष रमेश कत्ती यांच्यावर अविश्वासाचे राजकारण ढवळू लागल्याचे चित्र अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या निदर्शनाला आल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकांच्याकडे सुपूर्द केला आहे. या संदर्भात आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी रमेश कती यांनी कोणत्याही दबावाला पडून राजीनामा दिला नसून तो संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनातून दिला आहे. रमेश कत्ती यांनी संस्थेच्या हितासाठी व प्रगतीसाठी उत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार सुरू राहणार असून त्याला कोणीही राजकीय रंग देऊ नये. असे सांगून जिल्हा बँकेचे नवीन अध्यक्ष कोण ? याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.