IMG-20251030-WA0104

खानापुर : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना रमेश धबाले, अभिजीत सरदेसाई, सुनील पाटील, मुकुंद पाटील आदी
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी ; दररोज अधिक प्रमाणात वर्दळ असणाऱ्या लालवाडी ते चापगाव व चापगाव ते अवरोळी पर्यंतच्या रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा शिवस्वराज संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आला आहे. तसेच गुरुवारी कामाला लवकर सुरुवात करावी यासाठीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
पावसाला सुरुवात झाल्यापासून लालवाडी ते चापगाव पर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या मार्गावर अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे तसेच खड्ड्यांमुळे अनेकांच्या वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याची दखल घेऊन रस्त्याच्या कामाला लवकर सुरुवात करावी अन्यथा आंदोलन केले जाईल तसेच वेळेत काम होत नसेल तर स्वतःहून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले.
शिवस्वराज संघटनेचे उपाध्यक्ष रमेश धबाले यांनी चापगाव, शिवोली आदी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. त्यामुळे गळीत हंगामासाठी ऊस तोडणीला सुरुवात होणार आहे. मात्र रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी अडचण होणार आहे याचाही विचार सार्वजनिक बांधकाम खात्याने करणे गरजेचे आहे. रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार असेल तर सध्या ऊस वाहतूक करणाऱ्या आणि या भागातून येजा करणाऱ्या नागरिकांना अडचण होणे याची दखल घेऊन आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली.
शिवस्वराज संघटनेचे खजिनदार मुकुंद पाटील, अभिजीत सरदेसाई, सुनील पाटील, मिलिंद देसाई, संदेश कोडचवाडकर, म्हात्रु धबाले, प्रभू कदम आदी उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us