बेळगाव : दिवाळीनिमित्त ‘दीप संध्या’ भावगीतांची सुरेल मैफल उत्साहात!
दिवाळीनिमित्त ‘दीप संध्या’ भावगीतांची सुरेल मैफल उत्साहात संपन्न!
महिला मंडळांच्या सादरीकरणाने रंगली संगीताची मैफल; चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग
बेळगाव : तारांगण जननी ट्रस्ट आणि विजय भागवत फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ‘दीप संध्या’ ही मराठी भावगीतांची सुरेल मैफल मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाली. बेळगाव येथील एस. पी. एम. रोडवरील विश्वकर्मा महिला मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या संगीत मैफलीमध्ये विविध महिला मंडळांनी सहभाग नोंदवत एकापेक्षा एक सरस मराठी भावगीते आणि भक्तिगीते सादर केली. त्यांच्या सुमधुर गायनाला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. विशेष म्हणजे, अवघ्या सात ते आठ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ८० वर्षांच्या ज्येष्ठ आजींपर्यंत सर्व वयोगटांतील महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेत मैफलीची रंगत अधिकच वाढवली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांमधील कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘दीप संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शारदा ग्रुप, माऊली ग्रुप, श्रीराम महिला मंडळ, जानकी योगा ग्रुप, क्रांती महिला मंडळ, विश्वकर्मा महिला मंडळ, नाद, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ आदी महिला मंडळांतील सदस्यांनी विविध भावगीते आणि भक्तिगीतांचे सादरीकरण केले.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील, डॉ. दत्तप्रसाद गिजरे, विजय भागवत, एन. एम. सत्यनारायण, प्रभाकर सुतार, अनुराधा सुतार आणि अरुणा गोजे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कर्नाटक राज्य वैद्यरत्न पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल आयुर्वेदाचार्य डॉ. रुपेश साळुंखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनील चिगुळकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
‘दीप संदेश’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे संदेश न्यूजच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘दीप संदेश’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बेळगाव परिसरातील साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, स्थानिक साहित्यिकांच्या लेखनाला प्रोत्साहन मिळावे आणि येथील साहित्यिक चळवळीला बळकटी मिळावी, या उद्देशाने ‘दीप संदेश’ दिवाळी अंक प्रकाशित करण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
एकीकडे सुरेल भावगीतांची मैफल, दुसरीकडे गुणवंतांचा सन्मान आणि तिसरीकडे साहित्यिकांच्या लेखनविश्वाला प्रोत्साहन देणाऱ्या दिवाळी अंकाचे प्रकाशन, असा साहित्यिक, सांस्कृतिक आणि सन्मानाचा त्रिवेणी संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन स्मिता किलेकर यांनी केले. यावेळी डॉ. मनीषा नाडगुडा, सुधा माणगावकर, सविता वेसने, अर्चना पाटील, प्रतीक्षा प्रभू, रोशनी हुंदरे, शारदा भेकणे यांच्यासह अनेक संगीतप्रेमी आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.
खानापूर लाईव्ह | बेळगाव