खानापूरच्या ताराराणी महाविद्यालयात कै. पद्मजादेवी हलगेकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे शानदार उद्घाटन! ಖಾನಾಪುರದ ತಾರಾರಾಣಿ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ‘ದಿವಂಗತ ಪದ್ಮಜಾದೇವಿ ಹಲಗೇಕರ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಪರೀಕ್ಷಾ ಕೇಂದ್ರ’ದ ಅದ್ಧೂರಿ ಉದ್ಘಾಟನೆ!
खानापूरच्या ताराराणी महाविद्यालयात कै. पद्मजादेवी हलगेकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे शानदार उद्घाटन!
यूपीएससी, एमपीएससी, केपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
खानापूर : मराठा मंडळ संचालित खानापूर येथील म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात कै. श्रीमती पद्मजादेवी हलगेकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे शानदार उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पुण्याचे प्रसिद्ध वास्तुविशारद पीटर डिसोझा, गर्लगुंजी येथील उच्चविद्याविभूषित समाजसेवक प्रसाद विठ्ठल पाटील आणि संस्थेचे संचालक शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, केपीएससी, केएएस, बँकिंग तसेच अग्निवीर, एअरफोर्स यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व अभ्यास साहित्य उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
शेकडो दर्जेदार पुस्तकांचा ग्रंथसंग्रह उपलब्ध
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून वाचनाची सवय जोपासावी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीला योग्य वयात सुरुवात करावी, या हेतूने केंद्राच्या ग्रंथालयात विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत.
यामध्ये Word Power Made Easy, माझी पदवी माझे करिअर, Coding, General English, GK 2027, General Knowledge, NCERT पुस्तक संच, तात्याचा ठोकळा, प्रतियोगिता दर्पण, व्हिझार्ड यांसह विविध दर्जेदार ज्ञानकोष, साप्ताहिके व मासिकांचा समावेश आहे.
पुणे, बेंगळूर आणि मुंबई येथील दर्जेदार अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी व्यावसायिक शिवानंद चन्नेवाडकर आणि पीटर डिसोझा यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तसेच समाजसेवक प्रसाद पाटील यांनी या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी २५ हजार रुपयांची पुस्तके व इतर साहित्य देण्याची घोषणा केली.
यशाची पाच सूत्रे विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत : पीटर डिसोझा
प्रमुख पाहुणे पीटर डिसोझा यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या जीवनात पालक आणि शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या विचारातून ज्ञान, मदत आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण समाजाला समृद्ध बनवते, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी श्रद्धा, जीवनाचे ध्येय, कष्ट, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न ही यशाची पाच सूत्रे आत्मसात करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धा परीक्षांसाठी योग्य नियोजन आवश्यक : प्रसाद पाटील
समाजसेवक प्रसाद पाटील यांनी यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, तयारीची पद्धत, अभ्यासातील सातत्य आणि प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी आवश्यक असणारी जिद्द याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता व कमतरता ओळखून उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करावा. नियमित पुस्तक वाचन, वृत्तपत्रांचा अभ्यास आणि चालू घडामोडींचे ज्ञान यांना विशेष महत्त्व द्यावे, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातच अभ्यासाचे व्यासपीठ : प्राचार्य अरविंद पाटील
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य अरविंद पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके, अभ्यासाचे वातावरण आणि मार्गदर्शन महाविद्यालयातच उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घेऊन आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रार्थनागीताने झाली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि कै. श्रीमती पद्मजादेवी हलगेकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. पी. व्ही. कर्लेकर यांनी प्रास्ताविकातून केंद्रामागील संकल्पना व उद्देश स्पष्ट केला. यावेळी प्रमुख पाहुणे पीटर डिसोझा, प्रसाद पाटील आणि शिवाजीराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेचे संचालक शिवाजीराव पाटील, प्रा. टी. आर. जाधव, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धा परीक्षा केंद्राची जबाबदारी वाणिज्य विभागाचे प्रा. पी. व्ही. कर्लेकर आणि प्रा. एम. वाय. देसाई यांनी स्वीकारली आहे. विद्यार्थ्यांना आगामी काळात स्पर्धा परीक्षांसाठी सक्षमपणे तयार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. वनिता गवाडे यांनी केले.
कै. पद्मजादेवी हलगेकर यांच्या स्मरणार्थ सुरू झालेले हे स्पर्धा परीक्षा केंद्र खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संधी निर्माण करणारे ठरणार आहे.
— खानापूर लाईव्ह