नेरसा तालुका पंचायत क्षेत्रातून सौ. राजश्री ईश्वर बोबाटे निवडणूक लढविण्यास इच्छुक!
नेरसा तालुका पंचायत क्षेत्रातून सौ. राजश्री ईश्वर बोबाटे निवडणूक लढविण्यास इच्छुक!
सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बोबाटे यांच्या प्रदीर्घ सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक कार्याची राजकीय पातळीवर दखल घेण्याची अपेक्षा
खानापूर / प्रतिनिधी :
कर्नाटकातील जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांचे पडघम लवकरच वाजण्याची शक्यता असल्याने खानापूर तालुक्यातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. तालुक्यातील २० तालुका पंचायत मतदारसंघांची आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध मतदारसंघांतून इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर नेरसा तालुका पंचायत क्षेत्रातून मनतुर्गा येथील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते ईश्वर मंगेश बोबाटे यांच्या पत्नी सौ. राजश्री ईश्वर बोबाटे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
नेरसा तालुका पंचायत क्षेत्रासाठी सामान्य महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाल्याने या मतदारसंघातून महिला उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर सौ. राजश्री बोबाटे यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.
ईश्वर बोबाटे यांच्या सामाजिक कार्याची पार्श्वभूमी
नेरसा तालुका पंचायत क्षेत्रात मनतुर्गा, निलावडे आणि नेरसा या ग्रामपंचायत क्षेत्रांचा समावेश होतो. या परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये ईश्वर मंगेश बोबाटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
मनतुर्गा गावातील प्रत्येक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग राहिला असून, शासकीय उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
सुमारे २५ वर्षांपूर्वी मनतुर्गा येथे ‘सूर्योदय ग्रुप’च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. मराठी भाषेची बांधिलकी जपत सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात या ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. एकेकाळी खानापूर तालुक्यात सूर्योदय ग्रुपची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. आजही या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे.
मराठी सांस्कृतिक चळवळीतही सक्रिय सहभाग
खानापूर येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे ते गेल्या पंधरा वर्षांपासून सक्रिय सदस्य आहेत. सध्या प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे मराठी वाचनालयाच्या निर्मितीतही त्यांचे योगदान राहिले आहे.
सामाजिक कार्याबरोबरच राजकीय क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे क्रियाशील सदस्य म्हणून ते गेल्या पाच वर्षांपासून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या विविध उपक्रमांत सहभागी होत त्यांनी संघटनात्मक पातळीवर आपली भूमिका बजावली आहे.
पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष
नेरसा तालुका पंचायत क्षेत्रासाठी सामान्य महिला आरक्षण निश्चित झाल्याने सौ. राजश्री ईश्वर बोबाटे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. माजी आमदार तथा काँग्रेस नेत्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी या भागातून पक्षाची उमेदवारी दिल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सौ. राजश्री बोबाटे यांनी स्पष्ट केले आहे.
व्यक्तीच्या कार्याला महत्त्व की पक्षीय समीकरणांना?
नेरसा तालुका पंचायत क्षेत्राचा भौगोलिक विस्तार भीमगड अभयारण्य परिसरातील अनेक गावांपर्यंत पोहोचलेला आहे. या दुर्गम आणि ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा आणि मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
या भागातील निवडणुकीत पक्षीय समीकरणांबरोबरच उमेदवाराचा स्थानिक संपर्क, सामाजिक सहभाग आणि नागरिकांशी असलेले संबंध यांनाही महत्त्व प्राप्त होत असते. त्यामुळे ईश्वर बोबाटे यांच्या दीर्घकालीन सामाजिक व संघटनात्मक कार्याच्या पार्श्वभूमीवर सौ. राजश्री बोबाटे यांच्या संभाव्य उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आता काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीबाबत कोणता निर्णय घेतला जातो आणि नेरसा तालुका पंचायत क्षेत्रात आगामी निवडणुकीचे राजकीय चित्र कसे आकाराला येते, याकडे स्थानिक राजकीय निरीक्षक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.