पुणे : बेळगाव व खानापूर भागातील पुणे स्थित उद्योजकांच्या पाल्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खानापूर- बेळगाव मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने येत्या रविवार दि. 18 जून रोजी विद्यार्थी पालक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील सुहासिनी मंगल कार्यालय वडगाव बुद्रुक या ठिकाणी सायंकाळी ४.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मित्र मंडळ पुणे संघटनेचे अध्यक्ष पीटर डिसोजा राहणार आहेत. या मार्गदर्शन मेळाव्यात इयत्ता दहावी आणि बारावीत उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन आणि गुणगौरव असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ रूपालीताई चाखनकर, माजी नगरसेवक श्री राजाभाऊ तायगुडे, विश्वास उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब पोकळे प्रमुख वक्ते म्हणून करियर मार्गदर्शक विवेक वेलणकर, शेल्को स्पिंडलस् चे एमडी राजेश मंडलिक यासह मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या गौरव व मार्गदर्शन कार्यक्रमात आठवी, नववी, दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करण्यात येणार असून त्या विद्यार्थ्यांनी व पालकांनीही उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.