खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
आजकालच्या ग्लोबल दुनियेत सारी दुनिया मोठी मे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळातील गणेशोत्सव आणि अलीकडच्या काळातील गणेशोत्सवात एक एक वेगळीच छबी दिसते. अलीकडे घरगुती गणेशोत्सव मोठ्या आनंदात व मकर सजावट तथा उत्तम आराशीमध्ये केला जातो. पण अशांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी समाज मागे पडला आहे. अशा घरगुती गणेशोत्सवांना प्रोत्साहन द्यावे यासाठी जय जिजाऊ गणेश मंडळ शिवस्मारक चौक खानापूर यांच्या सहकार्याने ‘खानापूरवार्ता’ या वेबसाईट पोर्टल चे संस्थापक प्रसाद पाटील यांच्या दूरदृष्टी कोणातून खानापूर तालुक्यात घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2024 या उपक्रमाचे आयोजन केले होते. याला तालुक्यातील सत्तरहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या घरगुती मकर सजावट स्पर्धेत आपल्या घरगुती गणेश सजावटीचा व्हिडिओ काढून तो वेबसाईटच्या इंस्टाग्राम वर प्रसारित करून त्याला किती नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली, शेअर केले आणि मनोगत व्यक्त केले याच्या आधारावर विजेत्यांची निवड करण्यात आली होते. या घरगुती गणेशोत्सव स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम रविवारी सायंकाळी जिजाऊ गणेश मंडपात पार पडला.
विजेत्यांना बक्षीस वितरण प्रसंगी प्रसाद पाटील, ईश्वर घाडी, पिराजी कुराडे, वासुदेव चौगुले व मंडळाचे कार्यकर्ते
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस बैलूर येथील हनुरकर यांनी पटकावले. त्यांना रोख पाच हजार रुपये चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक विठ्ठल आळणावरकर बिदर भावी, तृतीय क्रमांक राजेश गावडे चोरला, चौथा क्रमांक गोपाळ दळवी करंबळ यांनी पटकावला. त्याचप्रमाणे अनुक्रमे श्रवण कुट्रे लालवाडी, निखिल पाटील तारवाड, विशाल सुतार निंगापूर गल्ली खानापूर, अभिषेक देसाई आसोगा ,नामदेव घाडी खानापूर, लक्ष्मी पाटील होनकल यांनी बक्षिसे पटकावली. तर उर्वरित स्पर्धकांना उत्तेजनार्थ म्हणून प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी होते. यावेळी या स्पर्धेत विषयी प्रास्ताविक खानापूरवार्ता चे संपादक प्रसाद पाटील यांनी करून कशा पद्धतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली याची माहिती दिली. यावेळी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पिराजी कुराडे, कार्याध्यक्ष पत्रकार वासुदेव चौगुले , तरुण भारत चे प्रतिनिधी विवेक गिरी माजी तालुका पंचायत सदस्य महादेव घाडी, जय जिजाऊ गणेश मंडळाचे अध्यक्ष भूषण पाटील, उपाध्यक्ष अभी शहापूरकर, गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.