दुसरी व तिसरी कुस्ती बरोबरीत झाल्याने निराशा


फोटो : खानापूर : पृथ्वीराज मोहोळ विजयी झाल्यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर, अध्यक्ष हणमंत गुरव, राजाराम गुरव, सदानंद होसुरकर, शंकर पाटील व इतर.
खानापूर लाईव्ह न्युज/प्रतिनिधी:
125 किलो वजनाच्या 22 वर्षीय महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना भारत केसरी सोनू कुमार हरियाणा याला लपेट डावावर अस्मान दाखवत खानापूरचे मैदान मारले. ही कुस्ती आमदार विठ्ठल हलगेकर, निजद नेते नासिर बागवान यांच्या हस्ते लावण्यात आली. दुसऱ्याच मिनिटाला पृथ्वीराजने सोनू कुमारच्या पायाला आकडी लावण्याचा प्रयत्न केला. त्यातून सोनूने सुटका करून घेतली. दोन्ही पैलवानांनी आक्रमक चालींवर भर दिला. अखेरीस दहाव्या मिनिटाला अनुभव पणाला लावत पृथ्वीराजने बाजी मारली.
आखाड्यात आमदार विठ्ठल हलगेकर, निजद नेते नासिर बागवान, कुस्ती संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव, माजी अध्यक्ष लक्ष्मण बामणे यांचे सत्कार करण्यात आले. इचलकरंजी येथील हलगीवादक कृष्णात घुले यांनी चित्तथरारक हलगी वादनाने मैदानाला रंगत आणली. कृष्णा चौगुले (राशिवडे) यांनी कुस्त्यांचे बहारदार समालोचन केले.
दुसऱ्या क्रमांकाची उपमहाराष्ट्र केसरी शुभम सिदनाळे विरुद्ध हिमाचल केसरी पवन कुमार यांच्यातील कुस्ती लैला साखर कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, भाजपचे माजी अध्यक्ष संजय कुबल, विठ्ठल गवस, रमेश नाईक, खानापूर को ऑप बँकेचे चेअरमन अमृत शेलार, संचालक मारुती पाटील, विजय गुरव, पंडित ओगले, प्रकाश पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. आमदार विठ्ठल हलगेकर व प्रदीप देसाई यांनी या कुस्तीचे पंच म्हणून काम पाहिले. एकमेकांची ताकद आजमावल्यानंतर एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो परतावून लावला. शुभम सिदनाळे जखमी झाल्याने ही कुस्ती बरोबरीत सोडण्यात आली.
तिसऱ्या क्रमांकाची कार्तिक काटे विरुद्ध संदीप मोटे यांच्यातील कुस्ती माजी आमदार अरविंद पाटील, माजी उपसभापती सुरेश देसाई भाजपचे माजी अध्यक्ष संजय कुबल माजी सभापती सयाजी पाटील आदींच्या हस्ते लावण्यात आली. डाव प्रतिडावाने तब्बल वीस मिनिटे ही कुस्ती गाजली. पण निकाल न आल्याने ही कुस्ती अखेर बरोबरीत सोडण्यात आली.
चौथ्या क्रमांकाचे शिवय्या पुजारी आणि ओम माने ही कुस्ती देखील बराच वेळ लांबली. त्यामुळे पंचांनी शेवटी गुणांवर निकाल देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शिवय्या पुजारी याने पहिला गुण मिळवून विजय मिळवला.
या आखाड्यात निखिल कंग्राळी, शिवा दड्डी, प्रेम कंग्राळी, विक्रम शिनोळी, विनायक येळ्ळूर, विकास चापगाव, सिद्धू धारवाड, ओमकार राशिवडे, रोहन कडोली, संजू दावणगिरी, प्रज्वल मजगाव, शंभू शिनोळी, संग्राम मोदेकोप, सुजल फोंडेकर, देवा येळ्ळूर, मंजुनाथ संतिबस्तवाड, राहुल माचीगड, दुर्गेश संतीबस्तवाड, नचिकेत रणकुंडये, जोतिबा चापगाव, रोहित कोलिक, प्रल्हाद मुचंडी, श्रीधर शिनोळी, शिवराज इटगी, कार्तिक निट्टूर यांनी चटकदार कुस्त्या करून नेत्रदीपक विजय मिळविले. प्रारंभी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा पार पडला. खानापूर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव व खजिनदार लक्ष्मण झांजरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी आमदार अरविंद पाटील, माजी ता. पं. सदस्य धनश्री सरदेसाई, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, उद्योजक भूषण काकतकर, प्रमोद कदम, शाहू राऊत यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन झाले. यावेळी
उद्योजक भूषण काकतकर, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, किशोर हेब्बाळकर, रुद्राप्पा हेंडोरी, राजाराम गुरव, पांडुरंग पाटील, प्रकाश मजगावी, मल्लाप्पा मारिहाळ, शंकर पाटील, सदानंद होसुरकर, अमोल बेळगावकर, प्रदीप देसाई आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मेंढ्यांच्या कुस्तीत स्थानिक मल्लांची बाजी
मेंढ्यासाठी दोन कुस्त्या झाल्या. या दोन्ही कुस्त्यांमध्ये स्थानिक मल्लांनी बाजी मारली.
मेंढ्यासाठी झालेल्या पहिल्या कुस्तीत पंकज चापगाव याने रामदास काकती याच्यावर कलाजंग डावावर तर महेश तीर्थकुंडे याने काशिलिंग जमखंडी याच्यावर निकाल डावावर नेत्रदीपक विजय मिळविला. महिलांच्या कुस्त्यांमध्ये शिवानी वड्डेबैल आणि ऋतुजा वडगाव यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला