file_0000000099448207a730817be4eb4b39

खानापूर (प्रतिनिधी) :

कारलगा, शिवोली आणि कारलगाहाट्टी या तीन गावांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 19 वर्षांनंतर 24 फेब्रुवारी 2027 रोजी होणाऱ्या ऐतिहासिक श्री महालक्ष्मी यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. यात्रेच्या पूर्वतयारीसाठी कारलगा येथे आयोजित नियोजन बैठकीत विविध समित्यांची स्थापना, भाविकांसाठी सुविधा आणि प्रशासनाच्या सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मनोहर पाटील होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होते. यावेळी खानापूर भाजप अध्यक्ष बसवराज सानिकोप, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, जोतिबा रेमाणी, मलाप्पा मारीहाळ, सुंदर कुलकर्णी, दत्ता कदम, पंच कमिटीचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी श्री महालक्ष्मी यात्रा ही केवळ धार्मिक सोहळा नसून तीन गावांच्या एकात्मतेचे, श्रद्धेचे आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असल्याचे सांगितले. यात्रेचे आयोजन पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकदिलाने करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, भाविकांसाठी मूलभूत सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आवश्यक पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही आमदार हलगेकर यांनी दिली.

पंच कमिटीच्या वतीने यात्रेच्या विविध कामांसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांनीही यात्रेच्या भव्य आणि यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

19 वर्षांनंतर भरत असलेल्या या ऐतिहासिक यात्रेमुळे कारलगा, शिवोली आणि कारलगाहाट्टी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, यात्रेच्या तयारीला आता प्रत्यक्ष वेग आला आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us