file_00000000a3b481fa9e98fba056998631

खानापूर (प्रतिनिधी) : 

कर्नाटक सरकारकडून कळसा-भंडुरा प्रकल्पासह कुसमळी, पारिश्वाड आणि तालुक्यातील इतर भागातून मलप्रभा नदी व तिच्या उपनद्या-नाल्यांचे पाणी इतर जिल्ह्यांकडे वळविण्याच्या हालचालींविरोधात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक, खानापूर येथे समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

समितीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आवाहनात म्हटले आहे की, प्रस्तावित प्रकल्पांमुळे खानापूर शहरासह संपूर्ण तालुक्याच्या पाण्याच्या हक्कावर गदा येण्याची भीती असून भविष्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. तसेच घनदाट जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणालाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकल्पांचा खानापूर तालुक्याला कोणताही लाभ होणार नसून उलट मोठे नुकसान सहन करावे लागेल, असा समितीचा दावा आहे.

या बैठकीत मलप्रभेचे पाणी वळविण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्याबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असून सीमाप्रश्न तसेच संघटनेच्या विविध विषयांवरही सविस्तर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांकडे सीमाप्रश्नाच्या जलद निकाली काढण्यासाठी सुरू केलेल्या एक लाख सह्यांच्या अभियानातील सह्यांचे पुस्तक संबंधित कार्यकर्त्यांनी बैठकीसोबत आणावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते व मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठकीला यशस्वी करावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटीलनिरंजन सरदेसाई तसेच सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us