बेंगळूर राज्यातील अनेक जिल्हयांमध्ये शुक्रवारी देखील जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. बेळगावसह कारवार, शिमोगा, चिक्कमंगळूर, उडुपी या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर कलबुर्गी, बिदर आणि विजापूर जिल्हयांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दक्षिण कर्नाटक भागातील मंगळूर, चिक्कमंगळूर, कोडगू, हासन आणि यादगिरी जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचे अनुमान असून येथे ताशी ४० ते ५० कि. मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कॅसलरॉक येथे धुवाधार
गुरुवारी सकाळी ८:३० वाजता संपलेल्या मागील २४ तासात कारवार जिल्हयातील कॅसलरॉक येथे १८ सें. मी., उडुपी जिल्ह्यातील सिद्धापूर येथे १७ सें. मी., चिक्कमंगळूर जिल्हयाच्या कम्मरडी येथे १४ सें. मी., कोट्टीगेहार येथे १३ सें. मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच आगुंबे, सोमवारपेठ, भागमंडल, कळस येथे प्रत्येकी ११ सें. मी. आणि यल्लापूर, गिरसप्पा येथे ९ सें. मी. पाऊस झाला आहे.