ओलमनी: विद्यार्थ्यांनी यशाला हुरळून न जाता भविष्याचा वेध घेऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी आणि मेहनत केली पाहिजेत तरच आपल्याला यशापर्यंत पोहोचता येते, यासाठी अढळ निश्चयच यशाचा अढळ पदावर नेतो असे प्रतिपादन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांनी केले.
द.म.शि मंडळ संचलित ओलमनी राजर्षी शाहू हायस्कूलच्या नूतन कार्यालय व वाचनालय भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. शांती फोमॅक प्रायव्हेट लिमिटेड उद्यमबाग यांच्या CSR योजनेतून व युनिटी फोर व्हिजन जीएसएस कॉलेज यांच्या सौजन्याने हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष तुकाराम हणमंतराव साबळे होते.
व्यासपीठावर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, शांती फोमॅक चे चेअरमन कांतीलाल पोरवाल यांचे बंधू शांतीलाल पोरवाल, शाळा सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष नारायण गुंड सुतार, निवृत्त प्राध्यापक के. व्ही. पाटील सर, सेवानिवृत्त केपीटीसीएल अधिकारी शाहू राऊत उपस्थित होते.
यावेळी नूतन वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन व एस. एस. एल. सी विद्यार्थ्यांचा गुणगौरव असा संयुक्त कार्यक्रम झाला. सुरुवातीला पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक सी.एस कदम यांनी प्रास्ताविक केले. राजाभाऊ पाटील, बिरजे व इतर प्रमुख पाहुण्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केंद्रात प्रथम आलेला श्रीनाथ वसंत सावंत व द्वितीय आलेली प्रीती संजय राऊत तसेच 80% च्या वर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे चेअरमन तुकाराम साबळे यांनी पुरस्कृत केलेली गौरवचिन्हे देऊन कांतीलाल पोरवाल ,राजाभाऊ पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सी.एस. कदम यांनी जाहीर केलेले तसेच मार्गदर्शिका व्ही.एल चौगुले यांनी देऊ केलेले बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी सुरुवातीला भूमिपूजन शांती फोमॅकचे शांतीलाल पोरवाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले, पौरोहित्य अशोक जगताप यांनी केले.
याप्रसंगी शांती फोमॅकचे शांतीलाल पोरवाल यांनी 2023-24 एस एस एल सी सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला पाच हजार रुपयांचे(5000) बक्षीस जाहीर केले. या कार्यक्रमासाठी शाळा सुधारणा मंडळाचे सदस्य गावकरी आजी-माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अजित सावंत सर यांनी केले तर शेवटी आभार वर्षा चौगुले यांनी मांडले.