Home » चापगाव : गणरायाच्या नामस्मरणात मोठी शक्ती!

चापगाव : गणरायाच्या नामस्मरणात मोठी शक्ती!

file_000000000c3c81fdac2199450a742f6b

चापगाव भागातील संपर्क रस्त्यांचा लवकरच विकास : आमदार विठ्ठल हलगेकर

चापगाव / प्रतिनिधी : आद्यदैवत गणराय हे सर्वांचे पूजनीय दैवत असून, त्यांच्या नामस्मरणात मोठी शक्ती आहे, असे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले.

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त चापगाव चव्हाट गल्ली येथील गणेश मंदिरात महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमदार हलगेकर यांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी चापगाव परिसरातील विविध विकासकामांची माहिती देताना संपर्क रस्त्यांच्या विकासाला लवकरच गती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

चापगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुहेरी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. लालवाडी ते शिवोली हा मुख्य रस्ता कारलगा महालक्ष्मी यात्रेपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच जळगा–चापगाव रस्त्याची प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत अंतिम दुरुस्ती लवकरच मार्गी लागणार आहे.

यडोगा रस्त्यासाठी उर्वरित एक किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, महिनाभरात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती आमदार हलगेकर यांनी दिली. तसेच मलप्रभा नदीपासून चापगावपर्यंतच्या रस्त्याची डागडुजी लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चापगावला जोडणारे सर्व संपर्क रस्ते टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. याशिवाय चापगाव येथील महालक्ष्मी मंदिरासाठी १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, शाळेच्या विकासासाठीही सहकार्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली. कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण जिवाई होते. प्रारंभी तालुका पंचायतीचे माजी उपसभापती मल्लाप्पा मारीहाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी गणेश मंडळाच्या स्थापनेविषयी पत्रकार पिराजी कुराडे यांनी, तर आमदारांच्या विकासकामांविषयी उपस्थित मान्यवरांनी विचारमंथन केले.

व्यासपीठावर सेवानिवृत्त सुरक्षा अधिकारी एम. आर. पाटील, नारायण कुऱ्हाडे, मष्णू सुतार, मारुती पाटील जळगे, पुंडलिक कुराडे, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष नारायण गुरव, पीकेपीएसचे अध्यक्ष उदय पाटील, गणपती कुराडे, पुंडलिक सुतार, भरमानी केसरकर, नारायण बांडगी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त जळगा येथे महिला मंडळाच्या वतीने हरिपाठ व जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली.

Do Share
error: Content is protected !!
Call Us