कुपटगिरी येथे मलप्रभा नदीकाठावर स्वच्छता अभियान!
डॉ. जगदीश बुवाजी यांच्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक
कुपटगिरी येथे मलप्रभा नदीकाठावर स्वच्छता अभियान
डॉ. जगदीश बुवाजी यांच्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक
खानापूर : गणेश चतुर्थीनिमित्त कुपटगिरी गावाजवळील मलप्रभा नदीच्या पात्रात भक्त पुंडलिक मंदिर परिसरात गणेश विसर्जन करण्यात आले. यानंतर नदीघाट परिसरात सजावटीचे साहित्य, फटाक्यांचा कचरा व अन्य निर्माल्य साचल्याने दुर्गंधी निर्माण झाली होती.
या परिस्थितीची दखल घेत कुपटगिरी येथील युवा डॉक्टर जगदीश बुवाजी यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह दिवसभर स्वच्छता अभियान राबविले. मंदिर परिसरातील पायऱ्यांवर साचलेला कचरा तसेच नदीच्या पाण्यात तरंगणारा कचरा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हटविला.
डॉ. जगदीश बुवाजी यांच्या या सामाजिक कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले असून, भक्त पुंडलिक मंदिर परिसरातील घाटाच्या स्वच्छतेसह विकासासाठी ग्रामपंचायतीनेही पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.