खानापुर: मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने कांजळे ता. खानापूर येथे सकस आहार आणि आरोग्य या संदर्भात जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात उद्घाटक म्हणून निलावडे ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर हे होते. बोलताना ते म्हणाले की, स्पर्धेत टिकायचे असेल तर आधी आरोग्य आणि सकस आहार महत्त्वाचा असतो. या दोन घटकांचा जिवनात योग्य समतोल साधला तर जीवन आरोग्यदायी आणि आयुर्मान वाढविणारे ठरेल. मात्र रस्त्यावर विकले जाणारे तळलेले पदार्थ आत्ताच्या तरुणाईचे आरोग्य धोक्यात आणण्याचे कार्य करत आहेत. असा आहार आत्ताच्या तरुणाईने वर्ज्य करावा आणि चांगला आहार घेत आपले आयुर्मान वाढवावे. कांजळे गावातील लोकांचे आयुर्मान साधारणता शंभर पर्यंतचे आहे. याचे कारण इथली शुद्ध हवा आणि पारंपारिक पद्धतीचा आहार या गोष्टी कारणीभूत आहेत. या गोष्टींचा विद्यार्थ्यांनीही अंगीकार करावा व आपले आयुर्मान वाढवावे. असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक एन सी. सी. ऑफिसर डॉ. आय एम. गुरव यांनी केले. कु. माहेश्वरी नांदुडकर हिच्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. मान्यवरांचा परिचय मुख्याध्यापक श्री. एस. के. पालकर यांनी केले. सूत्रसंचालन कांजळे मराठी शाळेचे सहशिक्षक श्री. रामाप्पा मक्कोजी यांनी केले तर आभार प्रदर्शन हरसनवाडी शाळेचे सहशिक्षक किल्लेकर यांनी केले. कार्यक्रमाला पिंटू पाटील, चंद्रकांत गावकर, बी. एस. एफ जवान बाल सल्ला समितीच्या अध्यक्षा श्रीमती पायल कृष्णा वाणी, शाम गावकर हरसनवाडी व कांजले मराठी शाळेचे शिक्षक व विद्यार्थीवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते . उद्घाटना नंतर कांजळे गावामध्ये जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी गावभर घोषणा देत आरोग्य आणि सकस आहाराचे महत्व ग्रामस्थांना पटवून दिले या वेगळ्या जागृत फेरीमुळे कांजळे गावातील ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये चैतन्य निर्माण झाले.