माणिकवाडीत २३ नोव्हेंबरपासून एनएसएसचे विशेष निवासी शिबिर; रावसाहेब वागळे विद्यालयाचा उपक्रम!
माणिकवाडीत २३ नोव्हेंबरपासून एनएसएसचे विशेष निवासी शिबिर; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते उद्घाटन
सात दिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन; आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन आणि पत्रकारितेवर मार्गदर्शन
खानापूर (प्रतिनिधी) : लोकमान्य सोसायटी संचालित रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील विशेष निवासी शिबिराचे आयोजन २३ ते २९ नोव्हेंबरदरम्यान माणिकवाडी येथे करण्यात आले आहे.
‘विकसित भारत, हरित भारत’, ‘व्यसनमुक्त आणि टीबीमुक्त युवा’ तसेच ‘युथ फॉर माय इंडिया’ या संकल्पनांवर आधारित या सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते होणार आहे.
लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष पंढरी परब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी डीडीपीयू एम. एम. कांबळे, एनएसएस जिल्हा नोडल अधिकारी एम. ए. मुल्ला, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सात दिवस विविध सामाजिक उपक्रमांची पर्वणी!
शिबिराच्या पहिल्या दिवशी २३ नोव्हेंबर रोजी पशुवैद्यकीय आरोग्य शिबिर आणि मानवी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २४ नोव्हेंबर रोजी व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
२५ नोव्हेंबर रोजी हरित भारत, वनसंवर्धन आणि शेतकरी जनजागृती, तर २६ नोव्हेंबर रोजी कायदेविषयक जनजागृती व संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे.
२७ नोव्हेंबर रोजी विकसित भारत, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
पत्रकारितेवर मान्यवरांचे मार्गदर्शन
२८ नोव्हेंबर रोजी ‘सामाजिक जनजागृतीसाठी पत्रकारिता’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तरुण भारतचे विवेक गिरी, पुढारीचे वासुदेव चौगुले, सकाळचे संदीप सुतार, आपला खानापूरचे दिनकर मरगळे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी पिराजी कुराडे आणि विजय कर्नाटकचे प्रसन्न कुलकर्णी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
२९ नोव्हेंबर रोजी समारोप समारंभाने शिबिराची सांगता होणार आहे. लोकमान्य सोसायटीचे संचालक किरण गावडे यांच्या हस्ते समारोप समारंभाचे उद्घाटन होणार असून, उपाध्यक्ष पंढरी परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजविण्याचा प्रयत्न
या निवासी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, आरोग्यविषयक जागृती, व्यसनमुक्ती, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. शरयू कदम-पाटील, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. खेमराज गडकरी आणि सहायक एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. शंकर गावडा यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘नॉट मी, बट यू!’ अर्थात ‘मी नव्हे, तर तुम्ही!’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रीदवाक्याला अनुसरून विद्यार्थ्यांनी समाजसेवेचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि समाजाच्या विकासात योगदान द्यावे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.