Home » चोर्ला भागातील मोबाईल रेंजचा प्रश्न सुटणार!

चोर्ला भागातील मोबाईल रेंजचा प्रश्न सुटणार!

file_00000000d4248211b6d5167ef0efe305

चोर्ला भागातील मोबाईल रेंजचा प्रश्न सुटणार!

चोर्ला येथे बीएसएनएल टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात; काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

खानापूर / प्रतिनिधी : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील चोर्ला परिसरासह जांबोटी ते गोवा सीमेलगतच्या दुर्गम गावांमधील मोबाईल नेटवर्कची समस्या आता लवकरच दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. चोरला येथे भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) नवीन मोबाईल टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर यश आले आहे.

खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरील अनेक गावांमध्ये आजही पुरेशा मोबाईल नेटवर्कचा अभाव आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल हातात असूनही नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना संपर्क साधणे, ऑनलाइन व्यवहार करणे तसेच दैनंदिन कामकाज पार पाडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः चोरला घाट परिसरात ही समस्या अधिक गंभीर आहे.

चोर्ला घाटातील दुर्गम डोंगरदऱ्यांमध्ये अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास त्याची माहिती पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा अथवा संबंधित विभागांपर्यंत पोहोचविण्यास विलंब होतो. त्यामुळे या परिसरात सक्षम मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी बीएसएनएलचा टॉवर उभारण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती.

या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक कवठाणकर तसेच पारवाड ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष प्रियांका गावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या माध्यमातूनही या प्रश्नाकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यात आले होते. अखेर या सर्व प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

चोर्ला येथे टॉवर उभारणीसाठी जागेची निश्चिती करण्यात आली असून, जागेचे सपाटीकरण आणि कॉलम उभारणीच्या कामाचा शुभारंभ नुकताच भूमिपूजनाने करण्यात आला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन टॉवर कार्यान्वित झाल्यानंतर चोरला परिसरासह पश्चिम भागातील अनेक दुर्गम गावांना मोबाईल नेटवर्कची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक, प्रवासी आणि आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आता प्रतीक्षा टॉवर कार्यान्वित होण्याची!

अनेक वर्षांपासूनच्या मागणीला मूर्त स्वरूप मिळत असल्याने या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे. मात्र, केवळ टॉवर उभारणीपुरते काम मर्यादित न ठेवता त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष नेटवर्क सेवा सुरू करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

भारतीय दूरसंचार निगमने (बीएसएनएल) उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून चोरला आणि परिसरातील दुर्गम गावांना दर्जेदार मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us