फोटो : निट्टूर : कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर बाजूला सुरेश देसाई, राजेश्वरी कुडची, रमेश नार्वेकर, सुभाष नार्वेकर, दशरथ गणेबैलकर व इतर.
खानापूर लाईव्ह न्युज/प्रतिनिधि:
तालुक्याच्या माती आणि माणसांमध्ये कष्टाचा संस्कार रुजला आहे. विकासासाठी विविध पातळ्यांवर तालुका वासियांना संघर्ष करावा लागत असला तरी प्रामाणिक कष्ट करण्याच्या उपजत गुणांमुळे नव्या दमाच्या तरुणाईने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांचा सार्थ अभिमान बाळगत असताना उद्याचे भविष्य असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना स्वावलंबन आणि कौशल्यपूर्ण जीवनाची शिकवण देण्याचा प्रयत्न शिक्षक व पालकांनी करायला हवा अशी अपेक्षा आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केली.
निट्टूर ता. खानापूर येथे शाळा सुधारणा समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने ‘जागर प्रतिभेचा’ या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे उद्घाटन करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष दशरथ गणेबैलकर होते.
आमदार हलगेकर म्हणाले, गावातील सरकारी शाळांनी अनेक पिढ्या घडविल्या आहेत. अनेक शाळांच्या सहा, सात दशकांपूर्वीच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत. अशा शाळांना भौतिक सुविधांची पूर्तता करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. प्रमुख वक्ते पत्रकार वासुदेव चौगुले म्हणाले, मातृभाषेतील शिक्षण हे प्रगतीचे लक्षण असून पालकांनी इंग्रजी शाळांच्या मोहजालातून बाहेर पडायला हवे. मातृभाषेतील शिक्षणाने मुलाचा भावनिक, मानसिक आणि शारीरिक विकास नैसर्गिक रीतीने होतो. शिक्षक, पालक आणि समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांनी सरकारी शाळांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणता येतो. असे सांगितले. माजी उपसभापती सुरेश देसाई, गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची, सीआरपी दिपा कोळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खानापूर को-ऑप बँकेचे संचालक रमेश नार्वेकर, पिसेदेव सोसायटीचे संचालक सुभाष नार्वेकर, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष नानू नार्वेकर, प्रवीण अगनोजी आदि उपस्थित होते.
संजय गणेबैलकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका पेडणेकर यांनी स्वागत तर सहशिक्षिका पटेल यांनी आभार मानले.
प्रतिभेला द्या योग्य वळण आणि प्रोस्ताहनही !
तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुप्त प्रतिभा आणि कलागुण ठासून भरले आहेत. त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. बालकांच्या प्रतिभा ओळखून त्यांना प्राथमिक अवस्थेतच वळण आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शिक्षण खात्याने डोळसपणे उपक्रम राबवावेत असे आवाहन आमदार हलगेकर यांनी केले.