
नंदगड: ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाची आज रविवारी सायंकाळी 6 वाजता भावपूर्ण नयनाने सांगता करण्यात आली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत भंडाऱ्यांची उधळण व हरहर महादेव च्या गजरामध्ये महालक्ष्मी देवीचा गदगा मंदिर परिसरात जल्लोषी मिरवणूक उत्सव झाला. प्रारंभी 5 वाजता नंदगड यात्रा कमिटीचे पंच कमिटी व बनकर हक्कदारी मंडळींच्या उपस्थितीमध्ये गाराणा घालून नवस मागण्यात आला. श्री ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा तब्बल 24 वर्षानंतर भरवण्यात आली होती. या यात्रेची आज रविवारी सायंकाळी सहा वाजता जल्लोषी मिरवणुकीने सांगता करण्यात आली. देवीसमोर गाराना झाल्यानंतर देवीच्या समोरील प्रांगणात देवीची भव्य अशी मिरवणूक झाली. हा मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी खानापूर तालुक्याच्या विविध भागातून हजारो भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. गेल्या बारा दिवसापासून येथील पंच कमिटी व हकदारी मंडळींनी या यात्रा उत्सवाचे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध रित्या आयोजन केले होते त्यामुळे कोणताही गालबोट न लागता ही यात्रा यशस्वी पार पडली. यात्रा यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासन, अग्निशामक दल आरोग्य विभाग, त्यांचे विशेष सहकार्य लाभले.