
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांना पक्के रस्ते, पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन तसेच वीज वाहिन्यांच्या कामांसाठी वनविभागाने आडकाठी न आणता विकास कामांना सहकार्य करावे अशी मागणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी व भूलवाद कमिटीचे सदस्य विनायक मुतगेकर यांनी वनमंत्री ईश्वर खांडरे यांच्याकडे केली.
आज बेंगलोर विधानसौध येथे ॲड घाडी यांनी वनमंत्री खांडरे यांची भेट घेऊन पश्चिम भागातील समस्यांचा पाढा वाचला. ॲड घाडी यांनी नुकताच मान येथे भेट देऊन तेथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. याबाबत त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याशी चर्चा करून तोडग्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली होती. त्यावरून माजी आमदार डॉ. निंबाळकर यांनी ॲड घाडी यांची वनमंत्री खांडरे यांच्याशी आज बंगळूर येथे भेट घडवून आणली. यावेळी बोलताना ॲड. घाडी यांनी जांबोटी, कणकुंबी भागातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी वनविभागाने आडकाठी आणू नये अशी मागणी केली. रस्ते व पूल नसल्याने गावापर्यंत बस सेवा उपलब्ध नाही. परिणामी पावसाळ्यात अनेक गावांना बेटांचे स्वरूप येते. वन्य प्राण्यांचे हल्ले व अतिवृष्टीमुळे आपत्कालीन प्रसंगी गावापर्यंत मदत जाऊन पोहोचणे कठीण झाले आहे. या समस्या सोडविण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचे जगणे कठीण झाले असून जंगलाचे संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या पश्चिम घाटवासीयांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी वनविभागाने सरकारच्या इतर विभागांशी समन्वय राखून कार्य करावे अशी विनंती त्यांनी केली.