कारवार: लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी सदाशिवगड व कारवार भागातील विविध भागात नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे.
खानापूर समितीचे कार्यकर्ते रणजीत पाटील, सुनील पाटील, अभिजित सरदेसाई, बाळकृष्ण पाटील आदिनी सदाशिवगड येथील कोंकण मराठा भवन येथे कोंकण मराठा समाजाचे सचिव उल्हास कदम, गुरुदास नाईक यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रणजीत पाटील यांनी मराठा समाजाच्या अनेक समस्या आहेत या समस्या सोडवून घेण्यासाठी आणि मराठी भाषेचे अस्तित्व टिकवूनन ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समितीने या मतदार संघात पहिल्यांदाच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यासाठी नियोजन केले आहे अशी माहिती दिली.
कोंकण मराठा समाजाचे सचिव उल्हास कदम यांनी कारवार भागात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्या सर्वांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करा असे मत व्यक्त केले. त्यांनतर रामनगर, जगलबेट, कुंभारवाडा, हाळगा, अनशी, गणेशगुडी आदी भागातील नागरिकांची भेट घेण्यात आली.