
● खानापूर /प्रतिनिधी: 2023- 24 शैक्षणिक वर्षाला कालपासून प्रारंभ झाला आहे. खानापूर तालुक्यात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता लक्षात घेता गेल्या दशकापासून खानापूर तालुक्यात अतिथी शिक्षकांच्या वर अतिभार टाकून शाळा चालवण्याचे प्रकार राज्य शिक्षण खात्याने घेतले आहे. पण कायमस्वरूपी शिक्षक नेमणुकीत मात्र शिक्षण खाते आजही मागे आहे.
खानापूर तालुक्यात यावर्षी 180 अतिथी शिक्षकांच्या जागा भरण्याचे निर्देश आहेत. पण खानापूर तालुक्यात यापैकी मराठी शाळात केवळ 38 अतिथी शिक्षकांच्या जागा भरून पुन्हा एकदा मराठी शाळा वरील वक्रदृष्टी कर्नाटकी सरकारने दाखवले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक शाळा शिक्षक अभावी बंद पडत चालले आहेत. सातवीपर्यंतच्या वर्गासाठी केवळ एक शिक्षक अशा पद्धतीने शैक्षणिक वर्ष चालवले जात असल्याने अनेक विद्यार्थी उत्तम शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तालुक्यात जवळपास 300 हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या सर्व जागा भरण्याचे निर्देश दरवर्षी दिले जातात. मात्र अतिथी शिक्षकांच्यावरच या शाळा चालवण्याचे काम शिक्षण खात्याने राबवले आहे. यावर्षी 180 शिक्षक नेमणुकीचा आदेश आहेत. त्यामध्ये 38 शिक्षक मराठी शाळांकरिता तर 129 कन्नड शिक्षक,12 उर्दू शिक्षक, व इंग्रजी माध्यमाचे 9 अतिथी शिक्षक नेमणुकीचे आदेश शिक्षण खात्याने दिले आहेत त्यामुळे मराठी भागातील शाळा कशा चालणार हा प्रश्न आता निरुत्तरित राहिला आहे. खरंतर कन्नड शाळा करिता राखीव ठेवण्यात आलेल्या 129 जागा या ज्या शाळेत शिक्षकांची संख्या अधिक आहे.अशाच शाळांमध्ये अधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे निवडीवरून दिसून येत आहे. त्यामुळे मराठी शाळा बाबत वक्रदृष्टी का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.