खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: महाराष्ट्र सरकारने आपली आरोग्य योजना राबवण्यासाठी बेळगावसह कर्नाटकच्या सीमाभागात प्रवेश करू नये असे महाराष्ट्र सरकारला कळवले असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
बैलहोंगल तालुक्यातील संगोळी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रांतिवीर संगोळी रायण्णा सैनिक स्कुलचे उदघाटन झाले.रॉक गार्डन आणि संग्रहालयाचे देखील लोकार्पण यावेळी करण्यात आले.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकारशी बोलणे झाल्याचे सांगितले.
कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्र सरकारशी संवाद साधला असून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कर्नाटकात प्रवेश करू नये असे सांगितले असल्याचे देखील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
महाराष्ट्र सरकारने बेळगाव आणि सीमाभागातील मराठी जनतेसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जारी केली असून काही दिवसापूर्वी त्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती.त्या नंतर बेळगावातील कन्नड संघटनांनी त्याला विरोध दर्शवून आक्रमक भूमिका घेतली होती.त्याला प्रतिसाद देऊन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या आरोग्य सेवेच्या ऑन लाईन नोंदणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या चार सेवा केंद्रांना आणि दोन इस्पितळाना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.नंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सेवा केंद्रांना टाळे ठोकून आठ दिवस सेवा केंद्र बंद ठेवण्याचा आदेश बजवला आहे.