खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
- बेळगांव : राजकीय व सामाजिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक, कृषी, शिक्षण, क्रीडा या क्षेत्रामध्ये आदरणीय शरद पवार यांचे उत्तुंग कार्य असुन, त्यांचे व्यापक कार्यसमाज घटकासाठी विशेषतः युवा पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे. शरद पवार फक्त मराठी मुलखापर्यंत सीमित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. त्यामुळे शरद पवार यांचे कार्य इत्यादी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूवर थोडक्यात प्रकाश टाकला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कायम ग्रामीण भागातील विद्यार्थी संशोधनाकडे वळले पाहिजेत असा आग्रह धरला. विज्ञानात अत्युच्च ज्ञान मिळविणारे विद्यार्थी तयार करण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचा विचार मांडला आणि कृतीमधून तो सिद्ध केला. कर्मवीर अण्णांचा हा विचार पुढे घेऊन जाण्यात अनेकांनी निश्चितच योगदान दिले.कर्मवीर अण्णांच्या विचारांवर कमालीची श्रद्धा असणाऱ्या श्री. पवार यांनी त्यांच्या मूळ विचारांचा ध्यास घेऊन सातत्याने पाठपुरावा करताना बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारण्याची भूमिका वेळोवेळी दाखवून दिली. त्यामुळे संस्थेच्या ध्येयधोरणानुसार आधुनिक काळातील बदलांशी सुसंगत अशा शिक्षण पद्धतीतून सर्व घटकापर्यंत शिक्षण पोचविण्याचे अखंड प्रयत्न सुरू आहेत. श्री. पवार यांचा हा शिक्षणविषयक दृष्टिकोन केवळ संस्थेपुरता सीमित नाही, पूर्ण महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी सातत्याने खटाटोप करताना दिसत आहे आणि आता देशभर या दृष्टीचा विस्तार होण्याचाही आशावाद आहे.शिक्षणाचा विचार आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टींची गरज ते नेहमीच व्यक्त करीत. शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या घटकाच्या मुला-मुलींपर्यंत शिक्षण पोचविण्यात आपण अयशस्वी झाल्याची खंतही ते व्यक्त करीत. शिक्षणप्रवाहापासून समाजातील मोठा वर्ग अद्यापही बाजूला असल्याचे निदर्शनास आणून देत आजही साक्षरतेचा प्रश्न आहे, स्त्री शिक्षणाची परवड आहे, शिक्षणाच्या अभावानेच अंधश्रद्धेचा प्रभाव आहे, असे मुद्दे ते प्रकर्षाने मांडतात. विस्तार वाढवला पाहिजे. दर्जाबाबत सतर्क राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह राहिल्याने रयत शिक्षण संस्थेने या विचारांची अंमलबजावणी सुरू केली. संस्थेच्या परिवारात आज लाखो मुले-मुली शिक्षण घेत आहेत. राजकीय क्षेत्रात भारत देशामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांचे विचार सदोदित देशातील समाजाला व युवकांसांठी नेहमी प्रेरणा देतील . असे प्रतिपादन कवी प्राध्यापक निलेश शिंदे यांनी माननीय श्री. शरदचंद्रजी पवार यांचे जीवनकार्य आणि सामाजिक योगदान एक चिंतन ” या विषयावर ते बोलत होते.
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बेळगाव जिल्हा शाखा यांच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त विशेष व्याख्यान आणि विविध कार्यक्रम, व वाढदिवस बेळगांव जिल्हा पक्षाच्या कार्यालयात मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता कार्यालयाच्या सभागृहात नुकताच कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री जोतिबा पाटील होते.
- व्यासपीठावर प्रमूख वक्ते म्हणून कवी प्राध्यापक निलेश शिंदे यांचे माननीय श्री. शरदचंद्रजी पवार यांचे जीवनकार्य आणि सामाजिक योगदान एक चिंतन ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रमूख अतिथी सामाजिक कार्यकर्ते व एस.सी/ एस.टी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे राष्ट्रीय राज्य सचिव श्री. दुर्गेश मेत्री , प्रेमा पाटील, माजी बेळगांव जिल्हा अध्यक्षा प्रभावती भालेकर, रुक्मिणी बल्लारी, रामकृष्ण सांबरेकर उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी विचार मांडले.
- कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. स्वागत शाम मंतेरो यांनी केले. प्रास्ताविक अमोल देसाई यांनी केले. परिचय आर. के. पाटील यांनी करून दिला. सुत्रसंचलन विनायक पाटील यांनी केले. तर आभार गौतम कांबळे यांनी मानले. यावेळी गोपी मेलगे, धनपाल अगगसीमणी , साईकिरण बल्लारी, सिद्धरामय्या बेळगुंदकर, विनय पाटील, अरुणा साके, निखत सय्यद, शबाना मुल्ला, आप्पाजी सपले, आकाश देसाई, मुनीर लतिफ, चांदणी बागवान, स्वप्नील हिंडलगेकर, मारुती सपले , यासह पक्षाचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.