खानापूरच्या श्रवण पाटीलची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी!
खानापूरच्या श्रवण पाटीलची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी!
८२ किलो ग्रीको-रोमन गटात कांस्यपदकाची कमाई; गुंडपी गावासह खानापूर तालुक्याचा गौरव
खानापूर : प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गुंडपी या छोट्याशा गावातील युवा मल्ल पै. श्रवण मर्याप्पा पाटील याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. त्याच्या या यशामुळे गुंडपी गावासह संपूर्ण खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कर्नाटक सरकारच्या राज्य पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा नुकत्याच धारवाड येथील जेएसएस कॉलेज, विद्यागिरी येथे पार पडल्या. या स्पर्धेत चंद्रगी येथील एस.पी.डी.सी.एल. महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या श्रवण पाटील याने ८२ किलो ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
अत्यंत मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर श्रवणने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश पाटील तसेच कुस्ती प्रशिक्षक मंजुनाथ टी. आणि रवी केंपणावर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
श्रवण हा खानापूर येथील प्रसिद्ध टाइल्स व्यावसायिक तथा श्रवण ट्रेडर्सचे मालक मर्याप्पा पाटील यांचा चिरंजीव आहे. त्याला पालकांकडूनही सातत्याने प्रोत्साहन मिळत आहे.
श्रवणच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडाप्रेमी, शिक्षक, मित्रपरिवार आणि खानापूर तालुक्यातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन होत असून भविष्यात त्याने राष्ट्रीय स्तरावरही यश संपादन करावे, अशा शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
खानापूर तालुक्याच्या या युवा कुस्तीपटूच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे! 💐