खानापूर, ता. २३ : कोणताही परवाना किंवा खरेदी बिल नसलेली मिक्सर ग्राइंडरची अनधिकृत वाहतूक करणारे वाहन लोंढा (ता. खानापूर) चेक पोस्टवर खानापूर पोलिसांच्या मदतीने निवडणुकीच्या नोडल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ६२ हजार ५०० रुपयांचे २५ मिक्सर ग्राइंडर व चारचाकी वाहनासह तिघांना ताब्यात घेण्यात आले. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी २९ चेकपोस्ट केले आहेत.काल गुरुवारी गोव्याहून खानापूरच्या दिशेने पांढऱ्या रंगाची मोटार २५ मिक्सर ग्राइंडर घेऊन जात होती. दरम्यान, लोंढा चेकपोस्ट सहाय्यक नोडल अधिकारी महेश मत्ती यांनी टेहाळणी पथक, स्टेटेस्टिक सर्व्हेलंस आणि खानापूर पोलिसांच्या मदतीने वाहन ताब्यात घेतले. यावेळी वाहन चालकाकडे मिक्सर खरेदीच्या पावत्या तसेच कोणताही तपशील नसल्याने चालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.